टॉवरबाधित शेतकऱ्यांकडून मावेजाची मागणी
--
चाकूर, ता. ८ (बातमीदार) : रेल्वे विद्युतीकरणासाठी शेतजमिनीत उभारलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून मावेजा देण्यास दिरंगाई केली जात आहे, शासकीय नियमानुसार मावेजा व्याजासह तातडीने देण्यात यावा, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. मावेजाची रक्कम खात्यावर जमा न झाल्यास १७ सप्टेंबर रोजी चाकूर रेल्वेस्थानकात रेल्वेसमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.
चाकूर रेल्वेस्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या ट्रॅक्शन पॉवर सब-स्टेशनसाठी १३२ केव्ही वीजवाहिनी शेतकऱ्यांच्या जमिनीतून नेण्यात आली. टॉवर उभारण्यास परवानगी देताना शासन नियमानुसार जमीन व पिकांच्या नुकसानीचा योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रकल्प पूर्ण होऊन रेल्वे विजेवर धावत असतानाही अद्याप मावेजा मिळालेला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. महसूल विभागाने मावेजाचा प्रस्ताव तयार करून दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद येथे पाठविला आहे. निवेदनावर शेतकरी निवृत्ती गायकवाड, बालाजी गायकवाड, ईश्वर पताळे, प्रल्हाद माने, राजेंद्र सूर्यवंशी, संजय पाटील, विवेकानंद रेड्डी, बालाजी धोंडगे, गुंडेराव धोंडगे, गोपाळ धोंडगे, केशव धोंडगे, माहेश्वरी पाटील, प्रभावती धोंडगे,महानंदा स्वामी, चंद्रकला पाटील, नागनाथ पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.