शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईत ''बटाव'' नको

शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईत ''बटाव'' नको
Published on: 
शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईत ‘बटाव’ नको --- बाजार समितीने आडत व्यापाऱ्यांचे कान टोचले, शेतकऱ्यांना दिलासा ------ हिंगोली, ता. २८ (बातमीदार) : मराठवाडा आणि विदर्भात हळद खरेदी-विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळद विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ पैस हवे असल्यास एक ते दीड टक्का ‘बटाव’ कापण्यात येतो. यात शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसतो. या प्रकारावरून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बाजार समितीने बुधवारी (ता. २८) यापुढे बटाव किंवा शेतकऱ्यांचे पैसे नियमबाह्य कपात केल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. बाजार समितीमध्ये हंगाम संपलेला असतानाही सध्या दररोज दीड ते दोन हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. लहान असो वा मोठा, प्रत्येक शेतकऱ्याच्या हळदीची विक्री पट्टी ही सहसा एक लाखाच्या पुढेच जाते. मात्र, एवढी मोठी रक्कम हातात पडताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हळद विकल्यानंतर आडत व्यापारी तत्काळ रोख रक्कम देत नाहीत आणि जर एखाद्या शेतकऱ्याला तातडीने पैशांची निकड किंवा आर्थिक अडचण असेल, तर व्यापाऱ्यांकडून सर्रास एक ते दीड टक्का ‘बटाव’ वसूल केला जातो. यावरून बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत, बाजार समितीच्या सचिवांनी तातडीने पावले उचलत सर्व आडत व्यापाऱ्यांना थेट आणि कडक शब्दांत निर्देशपत्र जारी केले. यानुसार, यापुढे कोणत्याही अनुज्ञप्तीधारक आडत्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री रकमेवर कोणत्याही प्रकारचा ‘बटाव’ अथवा बाजार समितीने ठरवून दिलेल्या कायदेशीर कपातीव्यतिरिक्त एकही रुपयाची अतिरिक्त कपात करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. ----------- हंगामात पाच हजार क्विंटलची आवक येथील बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्ड हळद-खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. बिट आणि वजनकाट्यावरील विश्वासार्हता पाहता हिंगोलीसह विदर्भातील यवतमाळ, वाशीम, वर्धा या जिल्ह्यांतील शेतकरी हळद विक्रीसाठी हिंगोलीचे मार्केट यार्ड गाठतात. हंगामात दररोज सुमारे पाच ते सहा हजार क्विंटलची आवक होते. -------- ((कोट)) शेतकऱ्यांनी हळद विक्री केल्यानंतर आडत व्यापाऱ्याकडून ‘बटाव’ कापण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यावरून आता बाजार समिती प्रशासनाने सर्व आडत व्यापाऱ्यांना पत्र बजावले असून, यापुढे बटाव कापण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. नियमाला बगल देण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल. - संपतराव मुंढे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती ---- ...अन् तडजोड करावी लागते मार्केट यार्डात शेतकरी आणि खरेदीदार यांच्यातील मधला दुवा आडत व्यापारी आहे. हळद खरेदी केल्यानंतर खरेदीदारांकडून एक ते दीड महिना पैसे मिळत नाहीत, तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी आडत व्यापाऱ्यांमार्फत हळद विक्री केल्यामुळे ते आडत्यांना रोख पैसे मागतात. अशा परिस्थितीत आडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना देण्याकरिता रोख पैसे आणायचे कोठून? हा प्रश्न आहे. त्यामुळेच काहीवेळा तडजोड करावी लागते, अशी माहिती एका आडत व्यापाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. ----------- ((कोट)) एक ना अनेक संकटांचा सामना करून शेतकरी शेतमाल पिकवितो. मात्र, बाजारात समाधानकारक भाव मिळत नाही. त्यातच हळद विक्री केल्यानंतर जर लगेच पैस हवे असतील, तर आडत व्यापाऱ्यांकडून एक ते दीड टक्के रक्कम कपात केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. पूर्वीपासूनच बटाव पद्धतीला शेतकऱ्यांचा विरोध आहे. आता बाजार समितीच्या निर्णयामुळे दिलासा मिळेल. - बाबाराव सुरुशे, हळद उत्पादक शेतकरी -- ((कोट)) शेतकरी मोठ्या कष्टाने शेतमाल पिकवितो. मात्र, आडत व्यापाऱ्यांकडून बटाव कापून शेतकऱ्यांची एक प्रकारे लूट करण्यात येते. एकीकडे नैसर्गिक संकटे, बाजारात समाधानकारक भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे पैसे कापून घेतल्या जात असतील तर ते चुकीचे आहे. याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने आडत व्यापाऱ्यांना पत्र बजावले. - विजय वानखेडे, जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com