पाच हजारांची मदत नको, सरसकट भरपाई द्या!
शेतकऱ्यांचा संताप; दिवाळीपूर्वी संपूर्ण मदत खात्यात जमा करण्याची मागणी
-----
बीड, ता. १५ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेली पाच हजारांची मदत तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तुकड्या-तुकड्यांत मदत देण्याऐवजी सरसकट नुकसानभरपाई एकाच वेळी जाहीर करून ती दिवाळीपूर्वी बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी होत आहे.
दुष्काळामुळे उत्पादनाची आशा मावळली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि बँकांच्या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीने कोणता दिलासा मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, वाढती महागाई, शेतीचे नुकसान आणि कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उर्वरित मदतीसाठी पुढील काळाची वाट पाहण्यास सांगण्याऐवजी शासनाने तातडीने संपूर्ण मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
-----
सरकारला आमच्या परिस्थितीची जाणीव असेल, तर पाच-दहा हजार रुपयांच्या तोकड्या मदतीच्या घोषणा बंद कराव्यात. वर्षभर घाम गाळून पिकवलेला शेतमाल डोळ्यांसमोर गेला. महागाईच्या काळात पाच हजार रुपयांत काय येणार? सरसकट नुकसानभरपाई करून दिवाळीपूर्वी हक्काचे पैसे खात्यात जमा करावेत.
-विठ्ठल जाधव, शेतकरी, पारगाव
-----
शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे बंद करावे. पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वेळ आली आहे आणि सरकारने पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर समाधान मानण्याची अपेक्षा ठेवली आहे. आम्हाला तुकड्या-तुकड्यांत मदत नको, तर सरसकट आणि संपूर्ण भरपाई एकाच वेळी हवी.
-पांडुरंग आरडे, शेतकरी, हिवरापाडी
-----
दुष्काळामुळे जगणे अवघड झाले आहे. डोक्यावर बँकेचे कर्ज असून, मुलाबाळांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत केवळ पाच हजार रुपये देऊन बोळवण करणे हा बळिराजाचा अपमान आहे. कागदी घोडे नाचवण्याऐवजी सरसकट मदत खात्यात जमा करावी.
-कचरू आळणे, शेतकरी, धर्मेवाडी