‘नुकसानग्रस्त पिकांचे
वस्तुनिष्ठ पंचनामे करा’
धाराशिव, ता. ५ ः गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारलेल्या ओढीमुळे पिके वाळू लागली असून शेतकरी संकटात सापडला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, माडज आणि पेठ सांगवी येथील शेतांवर जाऊन सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
दीर्घ खंडामुळे सोयाबीनची पिके पाण्याअभावी जळून खाक झाली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणे कठीण झाल्याची व्यथा मांडली. यावर ओमराजे यांनी प्रशासनाला तत्काळ सर्व नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. संकटाच्या या काळात बळिराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई व मदत मिळवून देण्यासाठी अंतिम टप्प्यापर्यंत पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी ऋषी मगर, गोपाळ सुरवसे, प्रतीक रोचकरी, गणेश रोचकरी, पिनू भोसले, संजय भोसले, शिवसेना उप तालुकाप्रमुख नरेंद्र माने, नारंगवाडीचे सरपंच शेखर घंटे, बसवराज शिंदे, उपसरपंच बलभीम काळे, तसेच ग्रामसेवक मानतुटे, कृषी सहायक बलसुरे, तलाठी सय्यद यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पेठ सांगवी, कवठा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.....
धाराशिव ः पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे करपलेल्या पिकांची पाहणी करताना खासदार निंबाळकर. यावेळी शेतकरी.
.....
फोटो क्रमांक ःOSM26B06914