शेतकऱ्यांचा संताप अनावर; पाटबंधारे कार्यालयाला ठोकले टाळे!

शेतकऱ्यांचा संताप अनावर; पाटबंधारे कार्यालयाला ठोकले टाळे!
Published on: 
सिंचनाचे पाणी रोखल्याने संताप - हट्टा येथील पाटबंधारे कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे हिंगोली, ता. ९ : वारंवार मागणी करूनही कालव्याचे पाणी सोडले जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. नऊ) आक्रमक पवित्रा घेत हट्टा येथील पूर्णा पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकले. संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर दोन तास चाललेल्या या तीव्र आंदोलनापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि सहा गावांसाठी तत्काळ पाणी सोडण्यात आले. पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या तपोवन मायनरमधून माटेगाव, परळी, ढवळगाव, सावंगी, ब्राह्मणगाव आणि सोन्ना या सहा गावांतील शेतीला पाणी पुरवले जाते. मात्र, रब्बी हंगामात पिके ऐन भरात असतानाच पाणी बंद असल्याने उभी पिके करपण्याच्या उंबरठ्यावर पोचली होती. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही अधिकारी दाद देत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी हट्टा येथील पाटबंधारे कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांना जाब विचारत मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले आणि कार्यालयासमोर ठिय्या मांडला. सिंचनाचे पाणी हक्काचे असून अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान खपवून घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. चौकट प्रशासनाकडून पाणी सोडताच आंदोलन मागे आंदोलनाची वाढती तीव्रता आणि शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सहाही गावांच्या शिवारातील पिकांसाठी कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश प्रत्यक्ष देण्यात आले. पाणी सोडल्याची खात्री पटल्यानंतरच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या निर्णयामुळे सहा गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, तूर्तास सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.