पालाईगुडा तलावात उतरून आंदोलन
---
पीककर्जासाठी शेतकरी आक्रमक, आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
----
सारखणी, ता. १८ (बातमीदार) : सिबिल खराब असल्याचे कारण देत बँकांकडून पीककर्ज नाकारले जात असल्याच्या निषेधार्थ माहूर व किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालाईगुडा तलावात उतरून आंदोलन करण्यात आले. पीककर्ज, दुष्काळी अनुदान आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पाण्यात उभे राहून बँकांविरोधात घोषणाबाजी केली. नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी शासनाच्या वतीने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
माहूर तालुक्यातील पंधराहून अधिक गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक दिवसांपासून निवेदने देऊनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. भारतीय स्टेट बँकेच्या माहूर, सारखणी व मांडवी शाखा तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माहूर, वाई व उमरी शाखांकडून सिबिल, सामायिक क्षेत्र आणि भोगवटादार वर्ग-२ यांसारखी कारणे देऊन खरीप व रब्बी हंगामातील पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पीककर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी, खरीप हंगामातील थकीत कर्ज आणि रब्बी हंगामातील नवीन कर्ज एकत्र मंजूर करावे, जाचक अटी दूर कराव्यात आणि दुष्काळी अनुदान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. खासदार हेमंत पाटील आणि आमदार भीमराव केराम यांच्या शिफारसपत्रांचा आदर करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
----
सिबिलची अट रद्द करा
‘शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेच पाहिजे’, ‘सिबिलची अट रद्द करा’, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनात रवी उत्तम राठोड, जिवला नाईक, साहेबराव जाधव, दिनेश राठोड, कवरसिंग राठोड, रमेश राठोड, अरविंद चव्हाण, सरपंच अर्जुन आडे, भारती पवार, यशवंत जाधव आणि मिलिंद पडगिलवार यांच्यासह महिला शेतकरी व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.