नीट, जेईई, सीईटीच्या शुल्काचे काय?
----------------
दुष्काळग्रस्त पालकांचा सवाल, सर्वच शैक्षणिक शुल्क माफीची मागणी
----------------
जळकोट शहर, ता. १२ : दहावी-बारावीच्या परीक्षाबरोबरच नीट, जेईई मेन आणि एमएचटी-सीईटी या परीक्षांचे शुल्कही माफ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जातात. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि फार्मसीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा महत्त्वाच्या असल्याने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या शुल्कातूनही दिलासा देण्याची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या सीबीएसई व नवोदय विद्यालयातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबतही शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. एका विद्यार्थ्याला शुल्कमाफी व दुसऱ्याला शुल्काची सक्ती, असा भेदभाव न करता राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी समान निकष लागू करावेत, अशी अपेक्षा पालक व्यक्त करीत आहेत.
यंदा दुष्काळाने शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा आर्थिक बोजा पालकांच्या माथी मारला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असतानाही अनेक शाळा महाविद्यालयांकडून शैक्षणिक शुल्क वसुली सुरूच असल्याच्या तक्रारीही आहेत.
काही ठिकाणी परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांच्या खात्यावर परत जमा होईल, असे सांगून शुल्क घेतले जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यासोबत अतिरिक्त रक्कमही आकारली जात असल्याच्याही तक्रारी आहेत. दुष्काळी तालुक्यांतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात वसतिगृहात राहतात. त्यांचे वसतिगृह शुल्कही माफ करण्याची मागणी होत आहे.
----