पान तीन मेन
---
खतांचे वाढले दर; अडचणीत आणखीनच भर
प्रमुख रासायनिक खतांच्या दरात ३९ ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ
--
जळकोट, ता. १२ (बातमीदार) ः खरीप हंगाम २०२६ मध्ये रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडली आहे. बियाणे, मशागत, मजुरी, कीटकनाशके आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाने शेतकरी आधीच त्रस्त असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.
जून २०२५ ते सप्टेंबर २०२६ या अलावधीत प्रमुख रासायनिक खतांच्या दरात ३९ ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशावर मोठा आर्थिक ताण आला आहे.
तालुक्यात सोयाबीन, मका, फळपिके, भाजीपाला आणि उसाचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पेरणीपूर्वीच खतांच्या खरेदीसाठी मोठी रक्कम उभी करावी लागते. अनेक शेतकरी पीककर्ज, उधारी किंवा बचतीच्या आधारावर हंगामाची तयारी करतात, त्यात खतांच्या दरवाढीमुळे एकरी उत्पादन खर्चात आणखी वाढ होत आहे.
--
खतांचे दर भडकले; ८० टक्क्यांपर्यंत वाढ
रासायनिक खतांमध्ये २०:२०:०:१३ या खताच्या दरात सर्वाधिक ८० टक्के वाढ झाली आहे. जून २०२५ मध्ये १ हजार २५० रुपये असलेले हे खत आता २ हजार २५० रुपयांवर पोचले आहे. १२:३२:१६ खताचा दर १ हजार ४७० रुपयांवरून २ हजार ४५० रुपये झाल्याने त्यात ६६.६७ टक्के वाढ झाली आहे. १०:२६:२६ खताचा दर १ हजार ४७० रुपयांवरून २ हजार ३०० रुपये झाला. त्यात ५६.४६ टक्के वाढ झाली. २४:२४:० खताचा दर १ हजार ८०० रुपयांवरून २ हजार ५०० रुपये झाला असून त्यात ३८.८९ टक्के वाढ झाली. २:२४:२४ खताचा दर १ हजार ८०० रुपयांवरून २ हजार ६०० रुपये झाल्याने त्याच्या दरात ४४.४४ टक्के वाढ झाली आहे. खतांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
--
खत, बियाणे, औषधे, मजुरी आणि मशागतीचा खर्च सातत्याने वाढत आहे; पण शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च भागवणे कठीण झाले आहे. रासायनिक खतांच्या दरवाढीचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
- संतोष डुमणे, शेतकरी
--
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाचे दर, वाहतूक खर्च तसेच काही खतांच्या आयातीवरील अवलंबित्व यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. केंद्र शासनाकडून युरियाच्या किमतीवर नियंत्रण ठेवले जाते; पण, इतर खतांच्या किमतीत परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो.
- एस.एस.पाटील, कृषी अधिकारी