बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान द्या
------
वडार समाज संघाची मागणी; नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याबाबत निवेदन
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १२ : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि रोजगाराच्या अभावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, तसेच कामगारांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशी मागणी वडार समाज संघाच्या वतीने करण्यात आली.
वडार समाज संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सानुग्रह अनुदानाबरोबरच बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणातील विलंब दूर करून प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करावी, सेतू सुविधा केंद्रांमार्फत होणारी नोंदणी बंद करून थेट नोंदणी व्यवस्था सुरू करावी, कौशल्य वृद्धी विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात यावे अशा विविध मागण्याही करण्यात आल्या.
मागील वर्षी शासनाने बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र अंमलबजावणी करण्यात आली नाही म्हणून आता घोषणा नकोत, कामगारांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा. कामगारांच्या नावाने योजना जाहीर करण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. पात्र कामगारांना विनाकारण कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. नोंदणीतील अडथळे दूर करून कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, अशी भूमिका मुद्दे यांनी मांडली. शासनाने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वडार समाज संघाच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी रमाकांत मुद्दे, राम आलाकुंटे, कृष्णा धोत्रे, बाबासाहेब भांडेकर, सचिन वाडीकर, आकाश मुद्दे, रवी भांडेकर, लखन वाडीकर आदी उपस्थित होते.
------