अग्निशमन दल केवळ नावापुरते
नको, प्रत्यक्ष आपत्तीत सक्षम हवे
शहर काँग्रेसकडून वाहने, इंधनसाठा, सुरक्षा साहित्याची मागणी
धाराशिव, ता. १६ ः शहरासह जिल्ह्यातील अग्निशमन सेवा तातडीने अद्ययावत व सक्षम करण्यात यावी, अशी मागणी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
आग लागणे, शॉर्टसर्किट, रस्ते अपघात तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या काळात नागरिकांचे जीवित व मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, अनेकदा मदत पोचण्यास होणारा विलंब आणि अपुऱ्या साधनसामग्रीमुळे मोठी वित्त व जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे यंत्रणा २४ तास तत्पर ठेवणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष धनंजय राऊत यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली.
शहर व जिल्ह्याच्या गरजेनुसार नवीन अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावेत आणि जुन्या वाहनांची नियमित देखभाल करावी, वाहनांमध्ये पुरेसा पाणीसाठा, पंप, पाइप, शिड्या, हायड्रॉलिक कटर व ब्रेकर यांसारखी आधुनिक उपकरणे असावीत, आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वाहनांमध्ये पुरेसा डिझेल साठा राखीव ठेवावा, तसेच रिक्त पदे भरून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायरप्रूफ कपडे, हेल्मेट, ऑक्सिजन मास्क, श्वसन उपकरणे, हातमोजे आणि बूट असे दर्जेदार सुरक्षा साहित्य मिळावे, त्यांना आधुनिक उपकरणे हाताळण्याचे नियमित प्रशिक्षणही दिले जावे, ग्रामीण व शहरी भागात तातडीने मदत पोचवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे आणि या निवेदनावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष धनंजय राऊत यांच्यासह खलील सय्यद, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, गोरोबा झेंडे, राजुदास आडे, अशोक बनसोडे, आरिफ मुलानी, पोपट शिंदे, अविनाश रणखांब आदी उपस्थित होते.