फटाक्यांच्या आतषबाजीवरून ‘फटका फटकी’
--
शहरात ठिकठिकाणी घडल्या घटना; छावणीत एकावर चाकूहल्ला
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : दिवाळीनिमित्त शहरभर आबालवृद्धांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावरून काही ठिकाणी वाद होऊन ‘फटका फटकी’ही झाली. यात छावणीत एकावर चाकूहल्ला करण्यात आला. यासह इतर घटनांमध्येही विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद झाले.
छावणी येथील नेहरू पुतळ्याजवळील एमएसईबी ऑफिसच्या कोपऱ्याजवळ मोपेडवरून आलेल्या तिघांनी दुचाकीवर फटाके फेकले. याचा जाब विचारल्यावरून शेख अफ्फान शेख उमर (वय २०, रा. गवळीपुरा, छावणी) आणि शेख जाहेद यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी एकाने शेख जाहेद यांच्या पोटावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
---
सौजन्यनगरात हाणामारी
पाणीपुरीवाल्याच्या समोर रविवारी (ता. आठ) रात्री फटाके फोडण्यावरून तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाल्याचे समोर आले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
३४ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सनी निकाळजे, अभिषेक निकाळजे, सुनील निकाळजे, अमोल शिंदेचा लहान भाऊ, अमोलची आई यांच्यासह इतरांनी गैरकायद्याची मंडळी जमवून वीट व दगड फेकून मारले आणि चाकूने वार करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले. याच परिसरातील घटनेत ४२ वर्षीय महिलेने दुसरी तक्रार दिली. त्यानुसार अशोक जाधव, राजू आव्हाड, विजय आव्हाड, आनंद साळवे आणि इतर महिलांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
---
पती-पत्नीस जिवे मारण्याची धमकी
‘मुलीने वाहनासमोर फटाके का वाजवले,’ यावरून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने महिलेला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना सिडको वाळूज महानगर-१ येथील तिरुपती पार्क परिसरात घडली. यावेळी संबंधित व्यक्तीने महिलेच्या पतीलाही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्या आधारे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पंडितराव ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
---
घाटी क्वॉर्टर्समध्ये शेजाऱ्यांमध्ये हाणामारी
फटाके फोडण्यावरून शेजाऱ्यांत हाणामारी झाल्याची घटना घाटी मेडिकल क्वॉर्टर्स परिसरात घडली. याप्रकरणी दोघांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले. सुमीत रवींद्र सौदे (वय ३८) यांच्या तक्रारीनुसार शेख शहाबाज, शेख हारून आणि शेख गुड्डू; तर दुसऱ्या गटाकडून शेख हारून शेख करीम (वय ६१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुमीत सौदे आणि दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
---
फटाका जवळ पडल्याने मारहाण
राजीव गांधी स्टेडियम परिसरात रविवारी (ता. आठ) रात्री दहाला तक्रारदार सद्दाम दस्तागीर पठाण (वय ३१, रा. चिश्तिया कॉलनी) हे मित्र आणि मुलांसह फटाके वाजवत होते. यावेळी फटाका जवळ पडल्याने शुभम राठोड, संजोग राठोड (रा. एन-६ सिडको) आणि इतर दोन अनोळखींनी सद्दाम यांना शिवीगाळ करीत बेल्टने मारहाण केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
---
महूनगर गल्लीत रॉडने हल्ला
रोहित संतोष गंगावणे (वय १६) दुचाकीवरून आजीला आणण्यासाठी जात होता. यावेळी योगेश आहेर याने त्याच्या वाहनावर फटाका फेकला. या वादातून योगेशने लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. शिवाय पीयूष गडवे आणि स्वप्नील तुपे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यास आलेल्या प्रथमेश नरवडे याच्या हातावर चाकूने वार केले.
--
मुकुंदवाडीतही गुन्हा नोंद
संतोषीमातानगर, मुकुंदवाडी येथे तक्रारदार रोहित राजू बावरिया (वय १७) घरासमोर फटाके वाजवत होता. यावेळी रघुवीर राजू शेजूळ याने पेटता फटाका त्याच्या एका नातलगाच्या अंगावर फेकला. रोहितने त्याला समजावून सांगितले असता रघुवीरने त्याचे साथीदार सागर आठवले आणि सुलतान शहा यांना बोलावून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.