दुष्काळग्रस्त मच्छीमारांचे कर्ज माफ करा
अखिल भारतीय भोई समाज संघटनेची मंत्र्यांकडे मागणी
------
माजलगाव, ता. २५ (बातमीदार) : आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी २०२४-२५ मध्ये घेतलेले मत्स्य व्यवसायाचे कर्ज माफ करावे, तसेच मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय भोई समाज संघटनेने मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली.
मत्स्यव्यवसायासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी एसबीआय बँक आणि ग्रामीण बँकेमार्फत कर्ज देण्यात आले आहे. मात्र, सध्याच्या काळात मत्स्य व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला असून, कर्जाची परतफेड करणे मच्छीमारांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे २०२४ आणि २०२५ या वर्षांत घेतलेले कर्ज माफ करावे, नवीन मच्छीमार सहकारी संस्था स्थापन करण्यासंदर्भात न्यायालयाच्या असलेल्या अडचणींमुळे अनेक स्थानिक मच्छीमार सभासदत्वापासून वंचित राहत आहेत. यात कहार, कहार भोई, झिंगा भोई, परदेसी भोई, फुटाणे भोई, ढीबर भोई, मलाव भोई हा समाज काही संस्थेच्या सभासदापासून वंचित आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेपासून ते वंचित राहतात त्यामुळे संस्थेच्या परिसरातील स्थानिक मच्छीमार सभासद करून घेण्यात यावे. जेणेकरून शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोचतील तसेच दुष्काळ असल्यामुळे सरसकट स्थानिक मच्छीमार कुटुंबांना पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भोई समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अंकुश रामभाऊ बलया भोई यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.