चारा टंचाईवर मात करण्यासाठी चोंडी येथे आढावा
----
गवत लागवडीची स्थिती आणि चारा उत्पादन क्षमतेची केली पाहणी
----
नांदेड, ता. १० : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुरण विकास योजनेंतर्गत चोंडी, नियतक्षेत्र माळाकोळी (ता. लोहा) येथे लागवड केलेल्या गवताची संयुक्त पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान गवत लागवडीची सद्यस्थिती, वाढ आणि संभाव्य चारा उत्पादन क्षमतेचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी कुरण विकास योजनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कुरणांचे संवर्धन, गवत लागवडीचे योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध चारा स्रोतांचा प्रभावी वापर याबाबतही या वेळी आढावा घेण्यात आला. दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आणि भविष्यातील चारा व्यवस्थापनाचे नियोजन करणे, हा या संयुक्त पाहणीचा प्रमुख उद्देश होता. या वेळी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रवीणकुमार घुले आणि माळाकोळीचे वनरक्षक तुळशीराम मुसंडे उपस्थित होते.