OSM26B07030
धाराशिव ः पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना मागण्यांचे निवेदन देताना मानवी हक्क अभियानचे पदाधिकारी. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पूजार आदी.
----
वन निवासींच्या हक्कासाठी ‘सत्याग्रह’
मानवी हक्क अभियानची कायद्यानुसार जमिनी नावे करण्याची मागणी
धाराशिव, ता.१८ : अनुसूचित जमाती (पारधी) आणि इतर पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यानुसार हक्क मिळवून देण्यासाठी ‘मानवी हक्क अभियान’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय वन अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
संघटनेचे संस्थापक सदस्य बजरंग ताटे आणि जिल्हाध्यक्षा माया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६, २००७ व २०१२ मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील पारधी व दलित समाजबांधवांना संविधानात्मक न्याय, समता आणि स्वातंत्र्य मिळावे, अशी मुख्य मागणी निवेदनात केली आहे.
....
प्रमुख मागण्या:
- वस्तीस्थानांचे वन निवासी प्लॉट पारधी बांधवांच्या नावावर करावेत.
- उपजीविकेसाठी वनजमिनीवर अवलंबून असलेल्यांच्या नावावर जमीन नोंदणी प्रक्रिया तत्काळ सुरू करावी.
- कलम ४(५) नुसार पारधी आदिवासींना त्यांच्या ताब्यातील वनजमिनीतून निष्काशीत किंवा बेदखल केले जाऊ नये.
- गाव, तालुका व जिल्हा पातळीवर वनहक्क समित्या स्थापन करून नोडल एजन्सी कार्यान्वित करावी.
....
फोटो क्रमांक ः OSM26B07030