((फोटो क्रमांक - ABD26J82128 ))
-----
‘वनधनाला मिळेना ‘जनधनाची’ साथ
---
वन विभागाच्या आवारातील विक्री केंद्राची अवस्था, बचत गटाची तीन वर्षांपासून धडपड
----
छत्रपती संभाजीनगर, ता. २६ : निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाऱ्या अस्सल वनौषधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी कन्नड तालुक्यातील ‘आई तुळजाभवानी महिला बचत गटा’तर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वर्षांपासून ‘वनधन जनधन विक्री केंद्र’ चालविले जात आहे. वन विभागाच्या सहकार्याने सुरू असलेल्या या उपक्रमातून आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या वनौषधींचा प्रसार केला जात असला, तरी अपेक्षेनुसार नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या केंद्रासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. परिणामी, केंद्र बंद करण्याची वेळदेखील येऊ शकते.
छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वेस्टेशन रोडवरील प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालय परिसरात हे विक्री केंद्र तीन वर्षांपासून सुरू आहे. नफ्यापेक्षा वनौषधींचा प्रसार आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, हेच यामागील मुख्य ध्येय आहे. याविषयी केंद्राच्या संचालिका अनिता मनगटे यांनी सांगितले, की अनेकदा यातून खूप मोठा आर्थिक नफा मिळतोच असे नाही; परंतु लोकांपर्यंत अस्सल वनौषधी पोचल्या पाहिजेत, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. वन विभागाकडून आम्हाला मोलाचे सहकार्य मिळत आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात खात्रीशीर वनौषधी सहज उपलब्ध होऊ शकतील. सध्या वन विभागाकडून बचत गटाने जागा भाड्याने घेतली आहे. महिन्याकाठी खूप काही विक्री होऊन नफा मिळत नाही. परंतु, काही वनौषधी घेण्यासाठी लोक आवर्जून या ठिकाणी येतात. गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाच्या संशोधन केंद्राकडूनदेखील वनौषधींची मागणी आमच्याकडे केली जाते.
---
उपलब्ध वनौषधी
- गुळवेल (गिलोय) पावडर
- वडी, हिरडा
- बेहडा पावडर
- कडुनिंब आणि तुळस पावडर
- औषधी काढा
- गोंडबी
- चारोळी
----
नागरिकांना आवाहन
निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आणि आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या विविध वनौषधींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रादेशिक वन अधिकारी कार्यालय परिसरातील या ‘वनधन जनधन विक्री केंद्राला’ आवर्जून भेट दिली तर याला चांगली चालना मिळेल, असेही कारभारी जाधव म्हणाले.
----
((कोट))
संथगतीने चालणारा व्यवसाय
विक्री केंद्राला प्रतिसाद अजिबातच नाही, असे म्हणता येणार नाही. हा संथगतीने निरंतर चालणारा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे, आमच्याकडे येणारे ग्राहक एकदा जोडले गेल्यानंतर कायमस्वरूपी संपर्कात राहतात.
- कारभारी जाधव, विक्री केंद्राचे संचालक