इंदिरानगर येथे शिबिरात ३३ जणांची आरोग्य तपासणी
नांदेड ः येथील इंदिरानगर येथे पूजा महिला मंडळाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३३ महिला-पुरुषांनी आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे तसेच त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षमपणे काम करता यावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला-पुरुषांना शेतात शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांचे शरीर निरोगी व सुदृढ राहावे आणि आरोग्य तपासणीसाठी होणारा दवाखान्याचा खर्च वाचावा, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन शिवसेना कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पावडे यांच्या हस्ते झाले. पूजा महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा दादाराव खिल्लारे अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्षा राणी दादाराव खिल्लारे, सचिव पूजा लक्ष्मण वायवळे, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक जे. टी. काळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पावडेवाडी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. किरण भाले यांनी उपस्थित महिला-पुरुषांची आरोग्य तपासणी केली. आरोग्य कर्मचारी एम. के. शेख व गंगाधर टोटोड यांनी रुग्णांना मोफत औषधे देऊन सहकार्य केले.