घरकुल लाभार्थींना मिळेना वाळू
-----
जप्तीच्या कारवाईनंतरची स्थिती, धोरणाचा फज्जा
राम काळगे
.........
निलंगा, ता. १० : राज्य शासनाने ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींना मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय जाहीर केला असून नदीकाठावर जप्त केलेली वाळू लाभार्थींना देण्याचा आदेश काढण्यात आला. परंतु, त्या लाभार्थींना वाळू मिळालीच नसल्यामुळे मोफत वाळू धोरणाचा फज्जा उडाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी महसूल विभागाकडून पाच ब्रास मोफत वाळू देणे नियमानुसार बंधनकारक आहे. निलंगा तहसील कार्यालयाने तालुक्यात २०२४-२०२५ या वर्षाची पंचायत समितीकडून यादी मागवली, त्यानुसार तालुक्यातील तुपडी, गिरकचाळ, सावरी, औराद शहाजानी यासह आदी गावातील जवळपास २०५ मंजूर लाभार्थींची यादी वाळूसाठी मंजूर करण्यात आली. त्यानुसार एकाही लाभार्थीला प्रत्यक्षात मोफत वाळू मिळालेली नाही.
........
तालुक्यातील जप्त वाळू
निलंगा तालुक्यातील बामणी (२३), धानोरा (२), नदीवाडी (६), चिचोंडी (४), लिंबाळा (५), जामगा (१०), येळनुर (२), औराद शहाजानी (१), सावरी (१), शिऊर (३७), शिऊर (१७), शिऊर (१५) आणि चांदुरी या महसूल मंडळांतर्गत गावांमध्ये एकूण १,१७९ ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती.
कोकळगावातील वाटप कागदावर?
तालुक्यातील कोकळगाव येथील १२ लाभार्थींना मोफत वाळूचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले जात असून तेथील काही लाभार्थींशी संपर्क साधला असता आम्हाला वाळू मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याबाबत माझे नाव तहसीलदारांनी काढलेल्या आदेशात आहे. परंतु, मला आजपर्यंत मोफत वाळू मिळाली नाही. मला घरकुल मंजूर आहे, वाळू मिळाली नसल्याने अडचणी येत आहेत.
-धनाजी पवार, ग्रामस्थ, जामगा
जप्त केलेल्या वाळूपैकी घरकुल लाभार्थींना मोफत वाळू देण्याबाबत शासनाचा आदेश आहे, त्याप्रमाणे संबंधित लाभार्थींना वाळू मिळावी यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांना आदेशित केले आहे. वाळू मिळत नसल्याचा प्रकार होत असल्यास चौकशी केली जाईल.
-प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, निलंगा
------------