पान ४ लीड
-----
स्वातंत्र्यासाठी लढलेल्या बापाच्या लेकाचा ४० वर्षांचा वनवास
जमिनीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ; तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ५ ः देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, छातीवर लाठ्या-काठ्या झेलल्या, त्यांच्याच वारसदारांवर स्वतंत्र भारतात हक्काच्या जमिनीसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ यावी, यासारखी दुसरी शोकांतिका कोणती? केज तालुक्यातील कापरेवाडी येथील एका स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलावर असाच दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या बापाचा हा लेक आज स्वतःच्या अवघ्या १० गुंठे जमिनीसाठी तब्बल ४० वर्षांपासून प्रशासनाच्या लालफितीशी एकाकी झुंज देत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी आपली जमीन देऊनही आजतागायत सात-बारा उताऱ्यावर अधिकृत नोंद न झाल्याने, या कुटुंबाला प्रशासकीय असंवेदनशीलतेचा मोठा फटका बसला आहे. स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी, या कुटुंबाची यंत्रणेच्या लालफितीतून सुटका झालेली नाही, ही संतापजनक वास्तविकता केज तालुक्यात समोर आली आहे.
जिल्ह्यातील केज तालुक्यातील कापरेवाडी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शांभाराव देशमुख यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. मात्र, आज त्यांचे पुत्र आनंदराव देशमुख हे याच स्वतंत्र देशात प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साळेगाव-नांदूरघाट-चौसाळा या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी आनंदराव देशमुख यांची १० गुंठे शेतजमीन संपादित करण्यात आली होती. शासनाच्या निर्देशानुसार ही जमीन रस्त्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्याचे कागदोपत्री अगदी स्पष्ट आहे. मात्र, १९८६ मध्ये सुरू झालेला हा भूसंपादनाचा आणि नोंदीचा तिढा २०२६ उजाडले तरी सुटलेला नाही. तब्बल ४० वर्षे उलटून गेल्यानंतरही संपादित केलेल्या या जमिनीची नोंद आजतागायत सात-बारा उताऱ्यावर झालेली नाही. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.
आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीची अधिकृत नोंद सात-बारावर व्हावी, हक्काची कागदपत्रे हातात मिळावीत यासाठी आनंदराव देशमुख हे गेल्या चार दशकांपासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, संवेदनशीलतेचा केवळ आव आणणारे अधिकारी वास्तवात कागदी पत्रांची देवाणघेवाण करून वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. एका साध्या नोंदीसाठी स्वातंत्र्यसैनिकाच्या वारसदाराला जर ४० वर्षे प्रशासकीय पातळीवर असा संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य आणि गरीब शेतकऱ्यांची अवस्था काय असेल? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कापरेवाडी ग्रामस्थांमधून या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तहसीलदार भरत गंगावणे आता या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कोणती कडक कारवाई करतात आणि आनंदराव देशमुख यांना ४० वर्षांनंतर तरी त्यांचा हक्क मिळवून देतात का, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
---------
तहसीलदारांचे तिसरे स्मरणपत्र; तरीही अधिकारी ढिम्म
या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल घेत उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी केजच्या तहसीलदारांना तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यापाठोपाठ केजचे तहसीलदार भरत गंगावणे यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी संजय धोत्रे यांना तिसरे स्मरणपत्र पाठवून जमीन संपादनाची ही प्रलंबित प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मात्र, वरिष्ठांच्या या कडक आदेशांना आणि स्मरणपत्रांना संबंधित उपविभागीय अभियंत्यांनी थेट केराची टोपली दाखवली आहे. तहसीलदारांच्या पत्रालाही जर जुमानले जात नसेल, तर नक्की कोणावर कारवाई करायची आणि सामान्य शेतकऱ्याने न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे.
------
कोट
माझ्या वडिलांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, पण आज त्यांच्याच मुलाला हक्काच्या १० गुंठे जमिनीसाठी ४० वर्षे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, ही मोठी शोकांतिका आहे. रस्त्यासाठी जमीन देऊनही सात-बारावर आमचे नाव आले नाही. तहसीलदारांच्या आदेशालाही अधिकारी जुमानत नसतील, तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? प्रशासनाने आणखी आमचा अंत न पाहता तातडीने सात-बारावर नोंद करून आम्हाला न्याय द्यावा.
- आनंदराव देशमुख, बाधीत शेतकरी, कापरेवाडी
--------
कापरेवाडी येथील जमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंत्यांना तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे तिसरे स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार, संबंधित विभागाकडून अहवाल मागवून घेऊन या ४० वर्षांच्या जुन्या जमीन संपादनाचा प्रश्न नियमानुसार लवकरात लवकर मार्गी लावला जाईल.
- भरत गंगावणे, तहसीलदार, केज