मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस
जन्मठेप, दहा हजार दंडाची शिक्षा
----
मुखेड, ता. १७ (बातमीदार) ः पैशांच्या वादातून होनवडज (ता. मुखेड) येथे मित्राचा खून करणाऱ्या युवकास अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पैशांच्या वादातून ता. ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर प्रभाकर जाधव (रा. होनवडज) याने शहाजी मोहन जाधव याच्यावर चाकूने वार केले होते. यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुखेड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक विलास व्ही. गोबाडे यांनी सखोल तपास करुन न्यायालयात दोषारोप दाखल केले होते.
न्यायालयात एकूण १७ साक्षीदार तपासले. प्रकरणात साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, वैज्ञानिक प्रयोग शाळेचा अहवाल व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुखेड न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय एस. पी. देशमुख यांनी शनिवारी (ता. १७) आरोपी ज्ञानेश्वर जाधव यास दोषी धरून कलम ३०२ भादवी अन्वये जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड शिक्षा सुनावली तसेच विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्याकडे मृताच्या आई वडिलांना नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून महिला पो. कॉ. राऊबाई मधुकरराव गुट्टे, पो. कॉ. ग्यानोबा केंद्रे यांनी सहकार्य केले.