जिल्ह्यामध्ये फळपीक विमा
योजनेचा अंबिया बहार सुरू
---
बीड, ता. ७ : हवामानाच्या अवकृपेमुळे फळबागांचे होणारे अतोनात नुकसान टाळण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा, मोसंबी, डाळिंब, संत्रा, केळी, द्राक्ष व पपई या सात मुख्य फळपिकांसाठी ही योजना लागू असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी एस.एस. साळवे यांनी केले.
या योजनेसाठी जिल्ह्यात इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.ची निवड करण्यात आली आहे. योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. बिगरकर्जदार शेतकऱ्यांना बँकेत कर्जदार नसल्याचे घोषणापत्र द्यावे लागेल, ज्या कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नाही, त्यांनी अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी बँकेला कळवणे बंधनकारक आहे; अन्यथा त्यांना आपोआप सहभागी धरले जाईल. प्रतिशेतकरी किमान २० गुंठे (०.२० हेक्टर), तर कमाल चार हेक्टर मर्यादेत विमा संरक्षण मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, ७/१२ उतारा, फळबागेचा जिओ टॅग फोटो आणि ई-पीक पाहणी असणे १०० टक्के बंधनकारक करण्यात आले आहे. यापैकी एकही बाब अपूर्ण असल्यास विमा प्रस्ताव रद्द होऊ शकतो.
-----
अर्जासाठी अशी अंतिम मुदत
द्राक्ष : १४ ऑक्टोबर २०२६
मोसंबी, केळी व पपई : ३१ ऑक्टोबर २०२६
संत्रा : ३० नोव्हेंबर २०२६
आंबा : ३१ डिसेंबर २०२६
डाळिंब : १४ जानेवारी २०२७