फुलंब्रीत सराफा व्यावसायिकांत
पार्किंगच्या कारणावरून वाद
फुलंब्री, ता. १६ (बातमीदार) : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सोनार गल्लीत वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून दोन सराफा व्यावसायिकांमध्ये शनिवारी (ता. १४) रात्री वाद झाला. याचे रूपांतर हाणामारीत होऊन एका सराफा व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकावर चक्क छर्ऱ्याची बंदूक रोखल्याची घटना घडली आहे. फुलंब्री पोलिसांनी संबंधित छर्ऱ्यांची बंदूक जप्त केली आहे. याप्रकरणी जितेंद्र वानखेडे यांच्या फिर्यादीवरून हरीश वर्मा यांच्याविरोधात रविवारी गुन्हा नोंद झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, की फुलंब्री शहरातील सोनार गल्लीत सराफा व्यावसायिक जितेंद्र वानखेडे आणि हरीश वर्मा यांची समोरासमोर दुकाने आहेत. शनिवारी रात्री दुकानासमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाला. सुरवातीला झालेल्या या वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. या घटनेनंतर वानखेडे यांनी फुलंब्री पोलिस ठाणे गाठून शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रारी दिली. तसेच वर्मा यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच बंदूक काढून आपल्यावर रोखल्याचा आरोप केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी वर्मा यांच्याकडे बंदुकीबाबत चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडील छर्ऱ्यांची बंदूक पोलिसांनी जप्त केली. शहराच्या मुख्य बाजारपेठेत दोन सराफा व्यावसायिकांमधील किरकोळ पार्किंगचा वाद थेट बंदूक रोखण्यापर्यंत पोचल्याने नागरिकांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.