गंभीरवाडीतील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्याचे वाटप
कळंब, ता. ५ (बातमीदार) : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सच्या वतीने ईटकूर गटातील पाच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गंभीरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या उपक्रमाचा कार्यक्रम पार पडला.
स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे प्रमुख तथा भाजपचे जिल्हा सचिव विठ्ठल माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. आढाळा, भोगजी, बहुला, आथर्डी आणि गंभीरवाडी येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते पी. जी. नाना तांबारे, कळंब पश्चिम विभागाचे अध्यक्ष अरुण चौधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय साळुंखे, जिल्हा सरचिटणीस शिवाजी गिड्डे, माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, गटनेते हर्षद अंबुरे, ॲड. रामराजे जाधव, ज्ञानेश्वर गंभीरे, आबासाहेब आडसूळ, सरपंच शिवाजी गोडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी देवकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक निशिकांत आडसूळ, सहशिक्षक तात्यासाहेब सुरवसे, सुधीर राऊत, सरवदे तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
..................
इंटर्नशिप डॉक्टरांच्या विद्यावेतनात
वाढ करण्याची मागणी ः डॉ. पाटील
धाराशिव, ता. ५ (बातमीदार) : राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना मिळणारे सध्याचे विद्यावेतन वाढत्या महागाईच्या तुलनेत अपुरे आहे. निवास, भोजन, प्रवास आणि दैनंदिन गरजा भागविताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंटर्नशिपच्या काळात हे डॉक्टर रुग्णालयांमध्ये नियमित रुग्णसेवा, आपत्कालीन सेवा आणि विविध वैद्यकीय जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन विद्यावेतनात योग्य वाढ करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप डॉक्टरांसाठी समान विद्यावेतन धोरण लागू करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
एएसएमआय महाराष्ट्रच्या वतीने इंटर्नशिप डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. पवनराजे देवगुडे यांनी आमदार डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधून संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडला असून, प्रतिनिधींना चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली आहे.
.............................
जळालेल्या पाच एकरातील ऊसाची तातडीने तोड
शेतकरी नेते संजय दुधगावकर यांच्या पाठपुराव्याला यश; संभाव्य नुकसान टळले
येरमाळा, ता. ५ (बातमीदार) : खारवती शिवारात डीपीतील शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या अमोल बापूराव पाटील यांच्या पाच एकर उसाला अखेर तातडीने ऊसतोड मिळाली. धाराशिव शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक तथा शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कारखाना प्रशासनाने ऊसतोड केल्याने शेतकऱ्याचे संभाव्य अतिरिक्त आर्थिक नुकसान टळले.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत उभा ऊस आगीत जळाल्याने अमोल पाटील यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. जळालेल्या उसाची वेळेत तोडणी न झाल्यास दिवसेंदिवस त्याचे वजन घटण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी संबंधित साखर कारखाना प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. जळालेल्या उसाची प्राधान्याने तोडणी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन कारखान्याकडून तातडीने ऊसतोड करण्यात आली.
वेळेत तोडणी झाल्याने वजनातील संभाव्य घट टळली असली, तरी आगीत पाच एकर उसाचे झालेले मूळ नुकसान मोठे आहे. या नुकसानीची शासनाकडून आर्थिक भरपाई मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे संजय पाटील दुधगावकर यांनी सांगितले.
......................
शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची मागणी
कळंब, ता. ५ (बातमीदार) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून त्याला हायड्रोलिक यंत्रणा बसवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि सकल शिवप्रेमी कळंब यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार कैलास पाटील यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. तसेच पुतळ्याला हायड्रोलिक यंत्रणा बसवून ऐतिहासिक वारशाला साजेसे भव्य आणि देखणे स्वरूप द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच संबंधित कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली. यावेळी अतुल गायकवाड, इस्माईल हन्नूरे, जनक कदम, सागर बाराते, शाम खबाले यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, सकल शिवप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.
...........
UMR26A19111
उमरगा ः रोटरी क्लबच्या वतीने मलंग विद्यालयातील दहावीच्या शंभर विद्यार्थ्यांना ‘स्टडी ॲप’ची भेट देण्यात आली.
दहावीच्या शंभर विद्यार्थ्यांना स्टडी ॲपची भेट
रोटरी क्लबचा शैक्षणिक उपक्रम; शिवशंकर व्हंडरे यांचा आर्थिक पुढाकार
उमरगा, ता. ५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुनियोजित आणि प्रभावी अभ्यास करता यावा, या उद्देशाने उमरगा रोटरी क्लबच्या वतीने शरणप्पा मलंग विद्यालयातील इयत्ता दहावीच्या शंभर विद्यार्थ्यांना विशेष ‘स्टडी ॲप’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे सदस्य शिवशंकर व्हंडरे यांनी संपूर्ण आर्थिक खर्च उचलला.
वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रोजेक्ट चेअरमन प्राचार्य डॉ. संजय अस्वले, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मदनसुरे, सचिव शिवशंकर व्हंडरे, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अस्वले यांनी विद्यार्थ्यांना स्टडी ॲपची माहिती दिली. मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे ॲप उपयुक्त असून, त्यात अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक साहित्याबरोबरच करिअर मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे क्षेत्र आणि भविष्यातील ध्येय निश्चित करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी रोटरी क्लबचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिवशंकर व्हंडरे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
...........................
TTR26A01438 राहुल कराळे
दिल्ली विकास प्राधिकरणच्या
आयुक्तपदी राहुल कराळे
तुरोरी, ता. ५ (बातमीदार) : भारतीय संरक्षण लेखा सेवेत २०११ च्या बॅचचे अधिकारी असलेले राहुल एकनाथ कराळे यांची दिल्ली विकास प्राधिकरणाच्या आयुक्त (कार्मिक) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाने ३० ऑक्टोबरला जारी केलेल्या आदेशानुसार पुढील पाच वर्षांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तुरोरी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव हे राहुल कराळे यांचे मूळ गाव आहे. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. भारतीय नौदलात मुंबई आणि गोवा येथे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या काँगो येथील लोकशाही प्रजासत्ताकातील स्थिरीकरण मोहिमेत लेखापरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भारतीय निवडणूक आयोगासाठी निवडणूक निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. संरक्षण लेखा आणि आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचा अनुभव उल्लेखनीय आहे. शांतिदूत परिवाराचे संस्थापक तथा तुरोरीचे रहिवासी, पोलिस अधीक्षक आणि सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांचे ते जावई आहेत. या नियुक्तीबद्दल तुरोरी परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
.....................
MKN26A00880
माकणी ः भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
‘फटाके टाळूया, पर्यावरण वाचवूया’
माकणीच्या भारत विद्यालयामध्ये जनजागृती
माकणी, ता. ५ (बातमीदार) : ‘फटाके टाळूया, पर्यावरण वाचवूया; प्रेमाचा दिवा लावूया, आनंदाची दिवाळी साजरी करूया!’ या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
दीपावली उत्सवानिमित्त गुरुवारी (ता. ५) हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरण, सुरक्षित दिवाळी आणि आनंदी जीवनासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला. शपथ देण्यापूर्वी प्रशालेचे प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे यांनी फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करताना सध्याच्या परिस्थितीत पर्यावरण रक्षण हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने पर्यावरणाप्रती जागरूक राहून प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक गणेश साठे, ज्येष्ठ शिक्षक किशोर पवार, उमेश कडले, रामराव पवार, दीपक शिंदे, प्रभाकर बनसोडे, नसीरपाशा मुजावर, अजित गायकवाड, राघवेंद्र चौधरी, विजय पवार, शुभांगी शिंदे, आळंगे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य गुंजोटे यांनी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
...........................
खामसवाडी ग्रामीण बँकेकडून
तीन कोटींचे पीककर्ज वाटप
खामसवाडी, ता. ५ (बातमीदार) : अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खामसवाडी शाखेने आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांना सुमारे तीन कोटी रुपयांचे नवीन पीककर्ज वितरित केले आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने शाखेने कर्जवाटपाला गती दिली आहे.
शाखाधिकारी अनंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाखेतील एकूण एक हजार ७६ शेतकरी कर्जमाफीस पात्र असून, त्यांचे जवळपास आठ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. आतापर्यंत कर्जमाफीच्या पाच याद्या प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये ७२० शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. यापैकी ३०० शेतकऱ्यांची नवीन कर्जप्रकरणे तयार करून त्यांना तीन कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मागणीनुसार उर्वरित शेतकऱ्यांची प्रकरणे तयार करून पाहणीअंती कर्जवाटप करण्यात येणार आहे. शाखेच्या कार्यक्षेत्रात खामसवाडी, नागझरवाडी, गोविंदपूर, गौरगाव आणि मळकरंजा या गावांचा समावेश आहे. नियमित कर्जफेड करणारे जवळपास ९०० शेतकरी असून, त्यांना शासनाच्या घोषणेनुसार ५० हजार रुपयांचे अनुदान मिळण्यास पात्रता आहे.
कर्जवाटपात वशिलेबाजी टाळून अर्ज प्राप्त झाल्याच्या क्रमाने प्रकरणांचा निपटारा केला जात असल्याचे शाखाधिकारी पाटील यांनी सांगितले. कर्जवाटपासाठी अनंत पाटील, राघव गौड, सौरभ लोंढे आणि हरिभाऊ भन्साळी प्रयत्नशील आहेत.