वर्गणी की खंडणी? पेठ बीडमध्ये गणपती वर्गणीसाठी गुंडगिरी; व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून थेट पोलीस ठाणे गाठले

वर्गणी की खंडणी? पेठ बीडमध्ये गणपती वर्गणीसाठी गुंडगिरी; व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून थेट पोलीस ठाणे गाठले
Published on
पान ४ लीड ---- वर्गणी की खंडणी? बाप्पाच्या वर्गणीसाठी कार्यकर्त्यांची गुंडगिरी संतापलेल्या व्यापाऱ्यांची थेट पोलिसांत धाव; दुकाने बंद ठेवून ठिय्या सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ८ ः सणासुदीचा काळ म्हणजे आनंद, उत्साह आणि चैतन्याचे अत्यंत प्रफुल्लित वातावरण. गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बीडमधील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या होत्या. पेठ बीड भागातील व्यापारीही दुकानांमध्ये बाप्पाच्या स्वागताच्या लगबगीत होते. पण, या आनंदी वातावरणाला अचानक गालबोट लागले. बाप्पाच्या भक्तीचा आधार घेत काही हुल्लडबाजांनी थेट गुंडगिरीचा मार्ग पत्करला. वर्गणी द्या, नाहीतर दुकाने कशी चालवता बघतो, अशी थेट धमकी कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांच्या तोंडावर दिली. या सक्तीच्या आणि जुलमी वसुलीमुळे व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. अन्यायासमोर न झुकता पेठ बीडमधील सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवली. शटर पाडून दुकाने कडकडीत बंद केली आणि आपला मोर्चा थेट पेठ बीड पोलिस ठाण्यावर वळवून तिथेच ठिय्या मांडला. पेठ बीड भागातील बाजारपेठेत काही स्थानिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते अव्वाच्या सव्वा रकमेची पावती फाडण्यासाठी व्यापाऱ्यांवर प्रचंड दबाव आणत होते. व्यापाऱ्यांनी नम्रपणे, आपल्या क्षमतेनुसार व इच्छेनुसार वर्गणी देण्याची तयारी दर्शवली. मात्र, हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी ते नाकारून अवाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. एवढ्या वर्गणीत काय होते? दुकाने कशी चालवता तेच बघतो, अशी दहशत निर्माण करणारी धमकी दिली गेली. या वाढत्या गुंडगिरीमुळे सर्व व्यापारी प्रचंड त्रस्त झाले. मागील काही दिवसांपासून हा संतापजनक प्रकार शहरात सुरू होता. धार्मिक सणाच्या नावाखाली सुरू असलेली ही वर्गणी नसून उघड खंडणी वसुलीच आहे, असा संतप्त आरोप करत व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आक्रोश केला. सक्तीची वसुली खपवून घेणार नाही, अशी ठाम भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली असून, अरेरावी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. ------ वर्गणी संकलनाचे कायदेशीर नियम सार्वजनिक गणेशोत्सवात वा अन्य सणांसाठी वर्गणी गोळा करताना धर्मादाय आयुक्तांची अधिकृत परवानगी किंवा नोंदणी प्रमाणपत्र असणे कायद्याने बंधनकारक आहे. वर्गणी पूर्णपणे ऐच्छिक असावी; त्यावर कोणतीही सक्ती किंवा विशिष्ट रकमेची आकारणी करता येत नाही. पावती पुस्तकावर नोंदणी क्रमांक, मंडळाचे नाव आणि अध्यक्षांची स्वाक्षरी अनिवार्य असते. सार्वजनिक रस्ता, बाजारपेठ किंवा दुकानांसमोर वाहतुकीला अडथळा आणून किंवा दुकाने बंद पाडून वर्गणी मागण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. कोणत्याही नागरिकाला अथवा व्यापाऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सक्तीची वर्गणी देण्यास भाग पाडणे हा थेट कायदेशीर अपराध ठरतो. --------- नियम मोडल्यास अन् तक्रार झाल्यास होणारे परिणाम नियम धाब्यावर बसवून सक्तीने वर्गणी मागितल्यास किंवा दमदाटी केल्यास संबंधित कार्यकर्त्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार खंडणी उकळणे, बेकायदेशीर धमकवणे आणि गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी थेट गुन्हे दाखल होऊ शकतात. व्यापाऱ्यांनी रीतसर तक्रार केल्यास पोलिसांकडून तात्काळ अटक कारवाई होऊन मंडळाची नोंदणी रद्द होऊ शकते. शिवाय, धर्मादाय आयुक्तांकडून मंडळाचे परवाने टांगणीला लागतात आणि भविष्यात सार्वजनिक मंडप उभारणी अथवा ध्वनिक्षेपकाची परवानगी नाकारली जाते. पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हे दाखल झाल्याने संबंधित कार्यकर्त्यांचे भविष्यातील चारित्र्य पडताळणी अहवाल नकारात्मक येऊन त्यांचे भवितव्य अडचणीत येऊ शकते. ---- कोट गणेशोत्सवाच्या नावाखाली सक्तीने वर्गणी मागणे किंवा व्यापाऱ्यांना दमदाटी करणे हा पूर्णपणे गैरकायदेशीर प्रकार आहे. सार्वजनिक मंडळांना वर्गणी संकलनासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची रीतसर परवानगी व नोंदणी असणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय किंवा सक्तीने वर्गणी वसूल करणाऱ्या मंडळांवर धर्मादाय कायद्यान्वये कडक कारवाई केली जाईल. कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा नागरिकाला वर्गणीसाठी त्रास दिल्यास त्यांनी तत्काळ धर्मादाय आयुक्त कार्यालय किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. - कांचनगंगा जाधव, धर्मादाय उपआयुक्त, बीड ------- व्यापारी वर्ग पोलिस ठाण्यात आला होता. वर्गणीसाठी अरेरावी आणि दमदाटी केली जात असल्याचे त्यांनी तोंडी सांगितले; मात्र अद्याप कोणाविरुद्धही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. व्यापारी आपसात चर्चा करून तक्रार देणार असल्याचे म्हणाले आहेत. व्यापाऱ्यांनी लेखी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली सक्तीने वर्गणी मागणाऱ्यांची गय केली जाणार नाही. - निलेश केळे, पोलिस निरीक्षक, पेठ बीड पोलिस ठाणे, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com