गणेश मंडळाच्या माध्यमातून
शासकीय योजनांच्या जनजागृती
---
लातूर, ता. १८ ः महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (गौर) येथून या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमात कृषी विभाग, जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, उपकृषी अधिकारी सुनील घारोळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आनंदवाडी (गौर) येथील संयुक्त गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश संजय चामे, उपाध्यक्ष ग्यानदेव गोपाळ चामे, सचिव रमण ज्ञानोबा चामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अर्थसाह्य देत आहे. या माध्यमातून मळणी यंत्रे, तेलघाणे यासारख्या शेतीशी निगडित छोट्या छोट्या उद्योगांसह इतरही व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी १ कोटी रुपयेपर्यंतच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येते, तर १७ लाख ५० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवक-युवतींनी घेवून गावात छोटे-छोटे उद्योग उभारावेत, असे आवाहन जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी केले. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मधाचे गाव या योजनांची माहिती दिली.
महाडीबीटीच्या माध्यमातून विविध लाभांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी स्वतः यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया होत आहे, असे घारोळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेततळे, फळबाग लागवड आदी योजनांची माहिती दिली.