गणेशोत्सवात जिल्ह्यात भक्तीसह आरोग्यसेवा
------------
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची माहिती
परभणी, ता. १० : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळांच्या ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत आरोग्य शिबिर घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने त्याच ठिकाणी आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियांनांतर्गत जनरल मेडिसिन व हृदयरोग, मधुमेह, त्वचाविकार, अस्थिरोग, पोटविकार, स्त्रीरोग, बालरोग व नेत्रतपासणी तज्ज्ञांद्वारे केली जाणार आहे. तसेच रक्तदाब, ब्लड शुगर, ईसीजी या तपासण्या केल्या जाणार आहेत व आवश्यक औषधी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
((चौकट)))
उपक्रमासाठी घेणार सहकार्य
या शिबिरांसाठी विविध शासकीय विभाग व यंत्रणांसह जिल्ह्यातील सेवाभावी सामाजिक संस्था, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्याद्वारे वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, आवश्यक निदानात्मक व उपचारात्मक साधने-साहित्य आणि पुरेशा प्रमाणात औषधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे.