घरोघरी शुभ पावलांनी अवतरली लक्ष्मी
गौरी-गणपती सणानिमित्त भक्तिमय वातावरण; घरोघरी सुवासिनींचा उत्साह
धाराशिव, ता. १८ ः धाराशिव शहरात लाडक्या गणराया पाठोपाठ शुक्रवारी गौरींचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात आगमन झाले आहे. ‘आल्या गं गौराई...’च्या गजरात धाराशिवकरांनी आपल्या लाडक्या महालक्ष्मींचे घराघरांमध्ये स्वागत केले. गणेशोत्सवाच्या या पावन काळात गौरीच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले.
......
पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना आणि सजावट ः
शहरातील सुभाषनगर, समता काॅलनी, समर्थनगर, सांजा रोड, जुना तुळजापूर नाका, जुने शहर, उंबरे कोटा परिसर तसेच इतर भागांतील घराघरांमध्ये गुरूवारी रात्री मंगलमय वातावरणात गौरीची स्थापना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जागून छत उभारणी, विद्युत रोषणाई, कलाकुसर, देखाव्यांच्या वस्तूंची मांडणी तसेच इतर पारंपरिक विधी करण्यात गृहिणी दंगून गेल्या. सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून, महालक्ष्मीची मुखवटे आणि प्रतिमा अत्यंत वेधक व कलात्मक पद्धतीने सजवल्या आहेत. आकर्षक आरास, दिव्यांची रोषणाई आणि फुलांच्या माळांनी प्रत्येक घर उजळून निघाले.
.......
बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड ः
गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव शहरातील नेहरू चौक, सुभाष चौक आणि कापड गल्ली या मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवारी सकाळी पूजेचे साहित्य, ताजी फुले, फळे, मिठाई आणि पारंपरिक वस्त्रांच्या खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची रेलचेल होती. विशेषतः गौरीसाठी लागणाऱ्या शेवंतीच्या आणि झेंडूच्या फुलांना मोठी मागणी दिसून आली. गौरीच्या आगमनानिमित्त घरोघरी पारंपरिक पक्वान्न, विशेषतः भाजणीचे वडे, पुरणपोळी आणि विविध भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
......