तेरा फुटांच्या मूर्तीला चांदीचे हात, हार आभूषणे
----
श्री सूर्य गणेश मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातोय ५५ वा गणेशोत्सव
---
नांदेड, ता.२१ : शहरातील जुनामोंढा भागातील श्री सूर्य गणेश मंडळाचे गणेशोत्सवाचे ५५ वे वर्ष असून, यंदा १३ फुटांची मूर्ती विराजमान आहे. एक किलो चांदीचा हार, गणरायाच्या हाताला ६०० ग्रॅमहून अधिक वजनाचे चांदीचे हात लड्डू पुरोहित मित्र मंडळाच्या वतीने अर्पण करण्यात आले.
वर्ष १९७१ मध्ये स्थापना झालेल्या या मंडळाने यंदाही भव्य गणेशमूर्तीची स्थापना करून शहरातील गणेशभक्तांचे लक्ष वेधले आहे. यावर्षी मंडळाच्या वतीने १३ फूट उंचीची मयूरावर विराजमान झालेली सुंदर आणि आकर्षक अशी पारंपरिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गतवर्षीपासून श्री गणेशाची मूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, गणेशोत्सव काळात मोठ्या गणेश मूर्ती शेजारी स्थापना केलेली छोटी श्री गणेशमूर्ती विसर्जित केली जाते.
---
मंडळ परिसरात सीसीटीव्हीची नजर
येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंदा मंडळाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या मूर्तीवरील स्टोन कलाकृती हे खास वैशिष्ट्य ठरत असून, ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. भव्य मूर्ती, आकर्षक सजावट राजस्थान येथील पिंक सिटीवर आधारित देखावा आणि आधुनिक प्रकाशयोजनेमुळे मंडळ परिसरात दिवसभर भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
---
कार्यकारिणीचा सक्रिय सहभाग
गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष राहुल भागवत, उपाध्यक्ष आकाश ठाकूर, तसेच लड्डू पुरोहित, श्रीकांत कौशिक, वीरूसिंह ठाकूर, हुकूमसिंह ठाकूर, मुकुंद येरमवार, करमचंद बाहेती, सदानंद भागवत, दीपक सिंह ठाकुर, नीलेश ठाकूर, सचिन ठाकूर, हरी ओम, आदी सदस्य कार्यरत असून, मूर्ती स्थापना, सजावट, सुरक्षेची व्यवस्था आणि भाविकांसाठीच्या सुविधा यासाठी सर्व सदस्य एकत्रित परिश्रम घेत आहेत. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून गणेश मंडळाने सातत्य राखले असून, पारंपरिकरीत्या साजरे होणाऱ्या या गणेशोत्सवाने परिसर गजबजून गेला आहे.
---
((कोट))
मागील वर्षीपासून आम्ही गणरायाची मोठी मूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य मंडपामध्ये गणरायाची काळ्या मातीपासून तयार केलेली पर्यावरण पूरक छोटी मूर्ती स्थापन करून त्या गणेश मूर्तीचे विधिवत पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाते व मोठी मूर्ती पुढील वर्षी त्यात बदल करून स्थापन करण्यात येते.
-लड्डू पुरोहित, सदस्य, श्री सूर्य गणेश मंडळ, जुना मोंढा नांदेड.