गणेशोत्सवासाठी व्यापारी महासंघाच्या १५ सूचना
--
रस्ते, पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करण्याची मागणी
---
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात व्हावा, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा श्री नव सार्वजनिक गणेश मंडळाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला १५ सूचना केल्या.
महापालिकेतर्फे सर्व गणेश मंडळांना विनामूल्य स्टेज परवानगी देण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे आभार मानले. मुख्य रस्त्यांवरील खड्डे पॅचवर्क करून बुजवावेत, तसेच गणेश मंडळांच्या परिसरात ड्रेनेज तुंबून राहू नये म्हणून जेट मशीनद्वारे आधीच सफाई करावी, अशी मागणी केली. गणेशोत्सव काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासह निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, स्ट्रीट लाइटची पाहणी करून मुख्य मार्गांवर अतिरिक्त फोकस लाइट लावावेत, अशा सूचना केल्या. मिरवणूक मार्गावरील महावितरणच्या धोकादायक तारा काढाव्यात किंवा उंच कराव्यात आणि उत्सव काळात भारनियमन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जुन्या शहरातील विविध भागांत फिरती सुलभ शौचालये उभारावीत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांसोबत होमगार्ड, एनसीसी विद्यार्थी व एसपीओची मदत घ्यावी आणि पूर्वीप्रमाणे शहर वाहतूक समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली. विनापरवानगी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर कारवाई करावी, पुलांवर जातीय अथवा धार्मिक ध्वज लावू नयेत, मंडळांनी विद्युत सुरक्षेची काळजी घ्यावी, भटक्या कुत्र्यांचा आणि जनावरांचा बंदोबस्त करावा आणि फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. उत्सवाच्या शेवटच्या चार दिवसांत रात्री १२ वाजल्यापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी द्यावी, तसेच शाळांच्या बससाठी सायंकाळी सातपर्यंत मुख्य मार्ग सुरू ठेवावेत, अशी मागणी राठी यांनी केली.