मंडळांना ४८ तासांत मिळणार वीजजोडणी
----
गणेशोत्सवानिमित्त महावितरणकडून सुविधा, आवश्यक कागदपत्रांसह मागविले अर्ज
----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३ : गणेशोत्सव व त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी तयारीला वेग येत असताना ‘महावितरण’नेही मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या अधिकृत वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. ४८ तासांत मंडळांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विघ्नहर्त्याचा उत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजपुरवठयाच्या वीज दरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीज जोडणी टाळून गणेश उत्सव व इतर सार्वजनिक उत्सवाकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.
ही घ्या काळजी
गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या.
मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्शुलेशन खराब झाल्यास अशा वायरमधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. त्यामुळे जोड काढावेत, किंवा जोड देण्यासाठी योग्य क्षमतेच्या इन्शुलेशन टेपने जोड देण्यात यावा.
स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते
मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी.
तक्रारींसह मदतीसाठी संपर्क क्रमांक
---
गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही अरविंद बुलबुले यांनी केले.
--