पान एक लीड
--
धाराशिव ः शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गणेशमूर्तींनी सजलेल्या स्टॉलवर मूर्ती खरेदी करताना ग्राहक. OSM26B06981
--
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया
विघ्नहर्त्याचे आज थाटात आगमन, ढोल-ताशांचा गजर अन् गुलालाची होणार उधळण
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. १३ ः ‘मंगलमूर्ती मोरया’च्या अखंड जयघोषात, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात आज (ता. १४) जिल्ह्यासह धाराशिव शहरात लाडक्या विघ्नहर्त्या श्री गणरायाचे अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात आगमन होत आहे. घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी अवघा जिल्हा सज्ज झाला असून, भक्तांची आतुरता ताणली गेली आहे.
बाजारपेठेत उत्साह अन् आनंदाला उधाण
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील बाजारपेठेत नवचैतन्य आले असून ग्राहकांच्या रेलचेलीने बाजारपेठ फुलून गेली आहे. मखर, रोषणाई, विविध प्रकारची फुले, दूर्वा, आघाडा आणि आकर्षक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच मोदक, पेढे, फळे आणि पूजेच्या साहित्याच्या दुकानांत खरेदीसाठी भक्तांची गर्दी झाल्याचे दिसून आले. फुलांचे व सजावटीच्या वस्तूंचे दर वधारले असले तरी भक्तांच्या उत्साहापुढे ते फिके पडले आहेत.
स्टॉल्सवर चैतन्य; पर्यावरणपूरक मूर्तींना पसंती
शहरातील राष्ट्रीय महामार्ग, जुनी बाजारपेठ, नेहरू चौक, बार्शी नाका, सेंट्रल बिल्डिंग, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी परिसरात उभारलेल्या स्टॉल्सवर विविध आकारांतील मनमोहक गणेशमूर्ती विक्रीसाठी सज्ज आहेत. पारंपरिक शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असला तरी त्यांची उपलब्धता कमी असल्याने पीओपी मुर्ती घेताना दिसून आले. मुर्ती खरेदीसाठी आज (सोमवारी) सकाळी नागरिकांची अधिक गर्दी होण्याची चिन्हे आहेत.
सार्वजनिक मंडळांचे मंडप सज्ज
शहरातील लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारून सज्ज ठेवले आहेत. त्यात भव्य मखर आणि नेत्रदीपक रोषणाई पूर्ण केली आहे. आता गणरायाला मंडपात विराजमान करण्यासाठी कार्यकर्ते आतुर झाले आहेत. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर सामाजिक प्रबोधन करणारे देखावे, ऐतिहासिक प्रसंग आणि रोषणाई करण्यात मंडळांचे कार्यकर्ते गुंतणार आहेत. ढोल-ताशा पथकांनीही मिरवणुकांमध्ये आपल्या वादनाने रंग भरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
गणेश स्थापनेसाठी हा आहे शुभ मुहूर्त
धार्मिक मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना आणि पूजा मध्यान्हकाळात करणे शुभ मानले जाते. विविध शहरांच्या पंचांगानुसार मुहूर्ताच्या वेळेत काही मिनिटांचा फरक आहे. उदाहरणार्थ, काही पंचांगांमध्ये सोमवारी सकाळी ११ वाजून काही मिनिटांपासून दुपारी दीड ते पावणेदोनपर्यंतचा कालावधी दिला आहे. त्यामुळे घरच्या पूजेसाठी आपल्या शहराच्या पंचांगातील वेळेला प्राधान्य देणे योग्य ठरेल, अशी माहिती गुरुजी प्रवीण नांदेडकर यांनी दिली. बहुतांश घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने, ब्रह्मवृंदांच्या मंत्रोपचारात प्रतिष्ठापना करण्यावर मंडळांसह नागरिकांचा भर राहणार आहे. त्यामुळे बहुतांश घरोघरी दुपारपर्यंत गणरायाचे वाजत-गाजत आगमन होणार आहे.
.......