लो-व्होल्टेजमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
-
गणेशवाडी उपकेंद्रांतर्गत लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ संतप्त
कायगाव, ता. ७ (बातमीदार) : गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी ३३ केव्ही वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या शेतवस्त्यांवर २ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी व्होल्टेज, बंद पडलेले वॉटर फिल्टर, मोबाइल चार्जिंगची अडचण आणि त्यातच बिबट्या-सर्पदंशाच्या भीतीने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. यामुळे महावितरणविरोधात परिसरात संताप व्यक्त होत आहे.
सिंगल फेज योजनेचा व्होल्टेज बुधवारपासून (ता. दोन) कमी करण्यात आल्याने वीज असतानाही पंखे आणि दिवे लागत नाहीत. सराव परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या मंद प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. रविवारी (ता. सहा) रात्री साडेसात ते सोमवारी सकाळी ६ः१८ पर्यंत सलग वीज गायब असल्याने रात्रभर शेतवस्त्या अंधारात होत्या. त्यातच गोदावरी आणि शिवना नदीकाठच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ‘शहरात चोवीस तास वीज आणि वस्त्यांवरच अंधार का?" असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. सिंगल फेजचा व्होल्टेज वाढवून तो अखंडित करावा आणि रात्रीच्या वेळी सुरू असलेले इमर्जन्सी लोडशेडिंग तत्काळ बंद करावे’, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रतिक्रिया
गोदावरी पट्ट्यातील शेतकऱ्यांवर महावितरणकडून अन्याय होत आहे. डेंगी, मलेरियाची साथ सुरू असताना लो-व्होल्टेजमुळे पंखाही फिरत नाही. शहरात वीज आणि आम्ही मात्र अंधारात, आम्ही माणसे नाही का? लोडशेडिंग सर्वांना समान करा, अन्यथा तीव्र उपोषण छेडू.
- भाऊसाहेब शेळके,
शेतकरी नेते, भिवधानोरा
--
प्रतिक्रिया
राज्यात विजेची अचानक मागणी (इमर्जन्सी लोड) वाढल्यास वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील कृषी (एजी) आणि गावठाण (ईजी) फीडरचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करावा लागतो. नागरिकांनी या परिस्थितीत सहकार्य करावे.
- अरविंद काळे,
उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गंगापूर