शिवीगाळ, मारहाणप्रकरणी
आरोपीस एक वर्षाची कैद
---------------
गंगाखेड, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील दुसलगाव येथील देवीच्या मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर महिला पोलिस पाटलाची मोटारसायकल अडवून त्यांना शिवीगाळ व पुतण्यास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस गंगाखेड न्यायालयाने एक वर्षाची साधी कैद व दंडाची शिक्षा सुनावली.
१७ ऑक्टोबर २०१७ रोजी दुसलगावच्या पोलिस पाटील संगीता लक्ष्मण कचरे या पुतण्यासह मोटारसायकलवरून शासकीय कामानिमित्त गंगाखेड येथे जात असताना गावातील देवी मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी पप्पू ऊर्फ पिता राजेभाऊ म्हात्रे याने त्यांची मोटारसायकल अडवली. यावेळी त्याने तू पोलिस पाटलीन झालीस तर तू काय आमची तक्रार करतेस का असे म्हणत शिवीगाळ करून त्यांच्यासोबत असलेल्या पुतण्यास लाथाबुक्क्याने व काठीने मारहाण केली. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस उपनिरीक्षक बी.डी. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान साक्षीदारांची तपासणी, फिर्यादी, जखमी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच तपासिक अंमलदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व तीन हजार रुपये दंड ठोठावला.
------