विनयभंगप्रकरणी आरोपीस
तीन वर्ष सश्रम कारावास
गंगाखेड, ता.१२ (बातमीदार) : चिमुकलीच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयात दाखल विशेष खटल्यात गंगाखेड येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावला.
गंगाखेड तालुक्यातील जवळा (रुमणा) येथे बिस्कीट आणण्यासाठी गेलेल्या एका सातवर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ११ ऑगस्ट २०२५ रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात ओकांर ऊर्फ दाद्या गोपाळराव सकट (रा.जवळा रुमणा) याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपास अधिकारी सपोनि सिद्धार्थ इंगळे यांनी प्रकरणाचा तपास करून (ता.२७) ऑगस्ट २०२५ न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. हे प्रकरण गंगाखेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश २ यांच्या न्यायालयात जलद गतीने चालविण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश-२ व्ही. एम. सुंदाळे यांनी दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून घेत सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासले व आरोपी ओंकार ऊर्फ दाद्या गोपाळराव सकट याने चिमुकलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा सिद्ध झाला. पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश-२ श्री व्ही. एम. सुंदाळे यांच्या न्यायालयाने आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता डी. यू. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता एस.बी. पौळ यांनी कामकाज पाहिले. त्यांना सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. वाकोडकर, गंगाखेड पोलिस ठाण्याच्या कोर्ट पैरवीकार श्रीमती एस.एस. जिंकलवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक जे.एच. पठाण, कोर्ट पैरवीकार एम.डी. कुंडगीर, श्रीमती एल.व्ही. मुंढे यांनी सहकार्य केले.
-------------