गंगामाऊली शुगरच्या ऊसदराचा तिढा कायम
केज, ता. २८ : उमरी येथील गंगामाऊली शुगर इंडस्ट्रीजच्या ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गतवर्षीच्या ऊसबिलाची थकीत रक्कम द्यावी, चालू गळीत हंगामाचा दर जाहीर करावा आणि पहिली उचल विनाकपात द्यावी, या मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी (ता. २७) कारखाना व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांमध्ये दोन तास बैठक झाली. पण, कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मागण्या प्रलंबित राहिल्या.
कारखाना व्यवस्थापनाने चालू हंगामासाठी प्रतिटन तीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. मात्र, हा दर अमान्य करत जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच गतवर्षी जाहीर केलेल्या ऊसदराची उर्वरित रक्कम तातडीने अदा करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. कारखान्याचे संचालक राहुल सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ऊसदर आणि थकीत देयकांबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कारखान्याचे चेअरमन आणि वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे आश्वासन सोनवणे यांनी दिले. मात्र, बैठकीत ऊसदर किंवा थकीत रकमेबाबत ठोस घोषणा झाली नाही. बैठकीला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे, सतीश शिंदे, अरविंद मोरे, दिलीप लोंढे, प्रमोद जाधव, नाना साखरे, प्रदीप काळे, विनोद धपाटे, सुग्रीव करपे, उमेश गायकवाड, फेरोजखान पठाण, गणेश पवार, विशाल शिंदे, संदीप भाकरे आणि अमर खाडे आदी उपस्थित होते.