शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात हाणामारी
गंगापूर ः तालुक्यातील जुन्या कायगाव येथे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले. शेख रहीम फतेह मोहम्मद व शेख निजाम फतेह मोहम्मद या भावांमध्ये बऱ्याच दिवसांपासून शेतजमिनीवरून वाद सुरू आहे.
शेख रहीम यांच्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ९) सकाळी बैठक होऊन जमिनीच्या वाटणीचा वाद मिटवण्यात आला होता. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास पुतण्या सोहेल शेख निजाम व शाहरुख शेख हे संभाजीनगर येथील मित्रांसह तेथे पोहोचले आणि पुन्हा वाद उफाळला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात शेख सोहेल निजाम (वय ३०), शाहरुख सोहेल शेख, शेख रहीम फतेह मोहम्मद (वय ६५), शाहनवाज शेख रहीम (वय २८) आणि बुशराबी शेख रहीम (वय ६०) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रे यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर सर्वांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाकडून गंगापूर पोलीस ठाण्यात ‘एमएलसी’ पाठवण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.