गंगापूर-खुलताबादेत पिके करपली

गंगापूर-खुलताबादेत पिके करपली
Published on
गंगापूर-खुलताबादेत पिके करपली --- सरसकट पंचनामे व टंचाई आराखडा जाहीर करण्याची मागणी --- छत्रपती संभाजीनगर, ता. १० : गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यांत दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची पिके करपली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. पिकांचे कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट पंचनामे करून तातडीने भरपाई आणि पीकविमा मंजूर करावा. शिवाय भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता तातडीने टंचाई निवारण आराखडा जाहीर करावा, अशी मागणी दोन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. निवेदनाचा आशय असा ः यंदा सुरवातीला झालेल्या किरकोळ पावसावर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणि खते खरेदी करून पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर दीड महिन्यापासून पाऊस गायब आहे. तीव्र उन्हामुळे शेतातील पिके कोमेजत आहेत. पिके वाचवण्यासाठी विहिरी किंवा कूपनलिकेवरून सिंचन करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हातात आलेले पीक तर गेलेच. पण, लागवडीचा खर्चही वाया गेल्यामुळे कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत बळिराजा सापडला आहे. या परिस्थितीची दखल घेत लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. प्रशासनाने कोणत्याही अटी न लावता प्रत्यक्ष बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवून विमा भरपाई मिळवून द्यावी, असा आग्रह धरण्यात आला. ---- पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होणार गंभीर! पावसाने ओढ दिल्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर आगामी काळात ग्रामीण भागात नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करून टंचाई आराखडा मंजूर करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कापसे, संगीता आमराव, रेखा चव्हाण, अमोल लोहकरे, रतन बत्तीसे, कुणाल दांडगे तसेच पंचायत समिती सदस्या सुनीता खंडागळे व कविता चव्हाण यांच्या सह्या आहेत. --- जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करमाड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या साधना कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शेतकरी व ग्रामीण भागातील रहिवाशांना वीजबिलात सवलत देणे, विद्यार्थ्यांच्या शुल्कात कपात करणे, तसेच कर्जवसुलीस स्थगिती देण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली. तसेच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न व्हावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com