भावाच्या अपेक्षेने साठवलेल्या कांद्याला चांगला भाव गंगापूर बाजार समितीत ४,७५० रुपयांचा दर.

भावाच्या अपेक्षेने साठवलेल्या कांद्याला चांगला भाव गंगापूर बाजार समितीत ४,७५० रुपयांचा दर.
Published on: 
गंगापूरमध्ये कांद्याला ४,७५० रुपयांचा भाव - बाजार समितीत १८० वाहनांमधून आवक, सरासरी भाव ३,२७५ रुपये गंगापूर, ता. २ (बातमीदार) : कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने गेल्या अनेक महिन्यांपासून कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजारात समाधानकारक दर मिळू लागला आहे. गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सकाळच्या लिलावात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ७५० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. दुष्काळी सावटाखाली आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर हा दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाईगडबड न करता आपला माल विक्रीस न काढता चाळींमध्ये सुरक्षित साठवून ठेवला होता. सध्या बाजारात उन्हाळ कांद्याची मागणी वाढल्याने दरामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. सकाळच्या सत्रात गंगापूर बाजार समितीत सुमारे १८० वाहनांमधून कांद्याची मोठी आवक झाली. या लिलावात कांद्याला कमीत कमी ८८० रुपये, तर सरासरी ३ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. चालू हंगामात कांद्याला मिळालेला हा सर्वाधिक भाव असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. [प्रतिक्रिया] "दुष्काळात कांद्याच्या चांगल्या भावाने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असली, तरी सर्व शेतकऱ्यांना रोजच्या रोज रोखीने पट्टी (रक्कम) अदा केली जात आहे." — अर्चना सुकासे, सभापती, कृ. उ. बाजार समिती, गंगापूर "शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कांदा योग्य नियोजन करून साठवला होता. आता वाढलेल्या दरामुळे त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत आहे. शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने माल विक्रीस आणावा." — सचिन काकडे, उपसभापती, कृ. उ. बाजार समिती, गंगापूर "कांदा पिकासाठी झालेला उत्पादन खर्च आणि चाळीतील साठवणुकीदरम्यान झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चांगल्या भावाची प्रतीक्षा होती. दिवाळीच्या तोंडावर हा दर मिळाल्याने कष्टाचे चीज झाले आहे." — अमोल तिखे / विठ्ठल बोडखे, कांदा उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.