जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी
---------
-पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १६ ः जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्हादंडाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश १६ नोव्हेंबर रात्री १२ः०१ पासून ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात संत नामदेव महाराज व टिपू सुलतान जयंती, गुरुनानक जयंती तसेच महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. याशिवाय राजकीय पक्ष व संघटनांकडून मोर्चे, निदर्शने, धरणे, रास्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, तलवारी, बंदुका, काठ्या, लाठ्या, दगड, स्फोटक पदार्थ बाळगण्यावरही निर्बंध आहेत. सार्वजनिक शांततेला बाधा पोचविणारी भाषणे, घोषणा आणि कृती करण्यास प्रतिबंध आहे. मात्र विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम तसेच सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी असलेल्या मिरवणुकांना सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी आदेशाचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
.......