(((फोटो ः सचिन माने देणार आहेत))))
---------
घराघरांत ज्येष्ठा गौरींचे विधिवत पूजन
--------
दाखवला पारंपरिक नैवेद्य, आज भावपूर्ण निरोप
--------
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : माहेरवाशीण म्हणून घरी आलेल्या ज्येष्ठा गौरींचे शुक्रवारी (ता. १८) ज्येष्ठा नक्षत्रावर विधिवत पूजन करण्यात आले. पुरणपोळी, कटाची आमटी, विविध भाज्या, भजी, पापड, लोणचे आणि फराळाचा नैवेद्य दाखवून गौराईचा पाहुणचार करण्यात आला. अनेक कुटुंबांत सुवासिनी आणि कुमारिकांना भोजनासाठी आमंत्रित करून, त्यांचे पूजन करत विडा व दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, शनिवारी पारंपारिक विधींनंतर गौराईंना शनिवारी भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.
महाराष्ट्रात तीन दिवसांचा हा सोहळा श्रद्धा आणि कौटुंबिक स्नेहाच्या वातावरणात साजरा होतो. काही घरांत गौरींच्या मुखवट्यांची, तर काही ठिकाणी खड्यांची स्थापना करून आवाहन, पूजन आणि विसर्जन हे विधी पार पडतात.
---
पोवत्याच्या गाठी पाडण्याचा विधी
विसर्जनाच्या दिवशी सकाळी सूत किंवा रेशमी धाग्याचे ‘पोवते’ (तांतू) तयार करण्याची प्रथा आहे. हळद-कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल आणि रेशमी धागा वापरून मंत्रोच्चारासह गाठी पाडल्या जातात. हे पोवते देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर पुरुष मनगटावर तर महिला गळ्यात धारण करतात. तसेच घरातील तिजोरी आणि धान्य साठवणुकीच्या जागेवरही हे पवित्र सूत बांधले जाते. घरात सुख, समृद्धी आणि मंगलता राहावी, अशी यामागे श्रद्धा आहे.
---
खीर-पापडाचा नैवेद्य
विसर्जनाच्या दिवशी गौराईला शेवयांची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड आणि काही ठिकाणी दही-भाताचा नैवेद्य दाखवला जातो. आरती आणि कापूर ओवाळणीनंतर, लेकीने सासरी सुखाने नांदावे आणि पुढील वर्षी पुन्हा लवकर यावे, अशी प्रार्थना करत अक्षता वाहून उत्तरपूजा केली जाते.
---
विसर्जनाचा मुहूर्त असा
शनिवारी सकाळी ६:२७ ते सायंकाळी ६:३८ या वेळेत विसर्जन विधी करता येईल. घरातील परंपरेनुसार पूजा-अर्चा करून गौरींची पाठवणी केली जाईल. कायमस्वरूपी धातूच्या मूर्ती असलेल्या घरांत प्रत्यक्ष विसर्जनाऐवजी प्रचलित पद्धतीने उत्तरपूजा केली जाईल.