पानन ४ साठी

पानन ४ साठी
Published on: 
पाडव्याच्या मुहूर्तावर गेवराईत रंगणार सांगीतिक महोत्सव गेवराई, चा. ५ (बातमीदार) ः दिवाळीचा सण आणि पाडव्याचा मुहूर्त म्हणजे आनंदाची उधळण! हाच आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी गेवराईकरांना यंदा एका सुरेल आणि बहारदार सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरात एका भव्य संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले असून, सुमधुर गाण्यांनी आणि तबल्याच्या नादाने ही पाडव्याची दुपार आणि संध्याकाळ रसिकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे. मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेदरम्यान गेवराईतील श्री संत सेना महाराज मंदिर (बाजारतळ) येथे हा सांगीतिक महोत्सव रंगेल. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक डॉ. दिलीप दोडके आणि डॉ. तुळशीराम आतकरे यांच्या सुमधुर आवाजात भावगीत, भक्तिगीत, गझल आणि ठुमरी गायनाचा मनसोक्त आनंद रसिकांना घेता येईल. या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या गायनाने, तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजनाने होईल. त्यानंतर शिवाजीराव गायकवाड यांचे बहारदार ''तबला सोलो'' वादन रसिकांना मंत्रमुग्ध करेल. महंत मसनानाथ घोगे, पंडित कल्याण गायकवाड, डॉ. अर्जुन जाधव आणि पंढरीनाथ तावरे यांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी रघुनाथ निंबाळकर, विष्णू भारती, दत्त गिरी, भाऊसाहेब जोशी, राजेंद्र वाघमारे, बळीराम औटे, महादेव भाटेपुरीकर, संदीप खरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सुमधुर संगीत महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व संगीतप्रेमी, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्रूर साखरे, परमेश्वर महाराज वाघमोडे, उत्तमराव सोलने, श्रीहरी पवार, रामानंद तपासे, अमोल माळवे, डॉ. अशोक काळे व डॉ. मंगेश लोळगे आदींसह आयोजकांनी केले आहे. ------------------- बीडमध्ये १० दिवसीय श्रामणेर व उपासिका शिबिर सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ५ (बातमीदार) ः भारतीय बौद्ध महासभा (बीड पश्चिम) शाखेच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे भव्य धम्मदीक्षा आणि जाती-जमाती ऐक्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींचे घटनादत्त हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या परिषदेत सर्वांनी एकजुटीने व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शाखेने केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान बीडमध्ये विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागसेन बुद्ध विहार (पालवन चौक) येथे १० दिवसीय श्रामणेर शिबिर भरणार आहे. इच्छुकांनी १० नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय शिक्षक व्ही. एन. निसर्गन गुरुजी यांच्याकडे नोंदणी करावी. तसेच १४ नोव्हेंबरला नागसेन विहारात सैनिक शिबिर होणार असून, यासाठी राजाभाऊ आठवले यांच्याकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय १४ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत त्रिरत्न बुद्ध विहार येथे महिलांसाठी विशेष धम्म उपासिका शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. ------- बनसारोळा येथे दुष्काळग्रस्तांना मिळाला भक्कम आधार केज, ता. ५ (बातमीदार) ः निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या केज तालुक्यातील बनसारोळा येथील ग्रामस्थांसाठी माणुसकीचा एक मोठा आधार उभा राहिला आहे. आपली माणसं, आपली जबाबदारी या अनोख्या सामाजिक उपक्रमातून गरजू शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना संकटकाळात मदतीचा हात देत, सामाजिक बांधिलकीचा एक अत्यंत प्रेरणादायी आणि स्तुत्य आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे. सध्या दुष्काळामुळे गाव परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि आर्थिक कोंडीने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या कठीण काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष मदतीची कृती करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी गरजू कुटुंबांना ५०० ते १००० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. तसेच रोजगाराला हातभार लावण्यासाठी महिलांना शिलाई मशीन, साड्या आणि चपला देण्यात आल्या. दुष्काळात मुलांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या प्रेरणादायी उपक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि आंतरराष्ट्रीय रामलीला महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश शर्मा यांच्या हस्ते पार पडले. दुष्काळाच्या या गडद अंधारात आपली माणसं, आपली जबाबदारी हा केवळ एक उपक्रम न राहता, तो संकटाच्या काळात एकमेकांना सावरण्याचा आणि माणुसकीचा खरा धर्म निभावण्याचा एक जिवंत संदेश ठरला आहे, अशी कृतज्ञतेची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. ----- समाजात एकी ठेवा, पाणी वाचवून निसर्ग जगवा अंकिता घुले यांचा कीर्तनातून प्रबोधनात्मक जागर; काकडहिरा येथे कीर्तन सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ५ ः कीर्तन हे केवळ भक्तीचे नव्हे, तर समाज प्रबोधनाचेही अत्यंत प्रभावी माध्यम आहे, याची प्रचिती बीड तालुक्यातील काकडहिरा येथे नुकतीच आली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष प्रबोधनात्मक कीर्तनातून राष्ट्रीय एकात्मता आणि पाणी बचत या ज्वलंत विषयांवर अतिशय सुंदर जनजागृती करण्यात आली. कीर्तनकार अंकिता घुले यांच्या सुमधुर आणि विचारप्रवर्तक वाणीने सर्व उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत बीड येथील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (काकू) महाविद्यालयाच्या ''आजीवन अध्ययन व विस्तार विभागा''च्या वतीने २ नोव्हेंबर रोजी या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंकिता घुले यांनी उपस्थितांना साद घालत सांगितले की, घरामध्ये आणि समाजामध्ये सदैव एकी ठेवा, एकमेकांशी सौख्याने नांदा. वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याची बचत करा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रीती बागलान, उपसरपंच विशाल बागलान आणि पोलिस पाटील शुभम बागलान उपस्थित होते. याशिवाय उपप्राचार्य डॉ. संजय देवळाणकर, डॉ. अनिता शिंदे, डॉ. शंकर राऊत, डॉ. लालासाहेब घुमरे, प्रा. इंद्रजित भांगे आणि समन्वयक डॉ. राहुल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमास विद्यापीठाचे संचालक डॉ. अश्विन रांजणीकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक डॉ. राहुल सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ वाघमारे यांनी, तर आभार डॉ. लालासाहेब घुमरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काकडहिरा येथील ग्रामस्थ, तरुण मंडळ व भजनी मंडळाने विशेष सहकार्य केले. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.