घाटीत ‘आयव्हीएफ’ची सुविधा, १०.२० कोटींच्या निधीस मान्यता
एसएसबीई इमारतीत उभारणार यंत्रणा; डॉ. सोनाली देशपांडे नोडल अधिकारी
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आता वंध्यत्व निवारणासाठी आधुनिक आयव्हीएफ उपचारांची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागासाठी अद्ययावत यंत्रसामग्री आणि आवश्यक सुविधा उभारण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी २० लाख ७० हजार रुपयांची मान्यता दिली आहे. ही यंत्रणा एसएसबीई इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या नोडल अधिकारी म्हणून डॉ. सोनाली देशपांडे काम पाहणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शुक्रवारी (ता. ३०) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षात हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) आणि आयसीएसआय (इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन) या आधुनिक उपचारपद्धतींसाठी आवश्यक यंत्रणा, स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष आणि निर्जंतुक वातावरणातील कक्ष उभारण्यात येणार आहेत. डॉ. सोनाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीई इमारतीत ही सुविधा विकसित केली जाणार आहे. या सुविधेमुळे अपत्यप्राप्तीसाठी उपचार घेऊ इच्छिणाऱ्या दांपत्यांना शासकीय रुग्णालयातच आधुनिक उपचारांचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अशा उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे घाटीत ही सुविधा सुरू झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
यंत्रणेसाठी सर्वाधिक निधी
या प्रकल्पात आयव्हीएफ यंत्रणा उभारण्यासाठी दोन कोटी ९९ लाख ७७ हजार १२० रुपये, तर आयसीएसआय सुविधेसाठी एक कोटी ९९ लाख एक हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय शस्त्रक्रिया कक्षातील उपकरणांसाठी एक कोटी ४७ लाख १७ हजार २०० रुपये आणि निर्जंतुक वातावरणातील कक्षासाठी एक कोटी ३५ लाख ३० हजार रुपयांची तरतूद आहे. इतर आवश्यक यंत्रसामग्री, औषधे आणि वापरायच्या साहित्याचाही या प्रकल्पात समावेश आहे. संपूर्ण उपकरणे आणि सुविधांची मूळ किंमत आठ कोटी ६५ लाख रुपये असून, त्यावर १८ टक्के जीएसटीचे एक कोटी ५५ लाख ७० हजार रुपये आहेत. त्यामुळे शासनाने एकूण १० कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या खरेदीला तांत्रिक मान्यता दिली आहे.
-----------
खरेदीनंतर सुविधा होणार कार्यान्वित
शासनाच्या मान्यतेनंतर आता आवश्यक यंत्रसामग्री खरेदी आणि सुविधा उभारणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर एसएसबीई इमारतीमध्ये आयव्हीएफ उपचार यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या उपचार सुविधांमध्ये भर पडणार आहे.