रब्बी हंगामाच्या मशागतीची लगबग
-
गिरगाव परिसरातील शेतकऱ्यांची मदार येलदरीच्या पाण्यावर
गिरगाव, ता. २५ (बातमीदार) : वसमत तालुक्यातील गिरगाव व परिसरात शेतकऱ्यांनी आगामी रब्बी हंगामासाठी शेती मशागतीच्या कामांना जोरदार सुरवात केली आहे. यंदा खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून, विहिरी आणि विंधन विहिरींच्या (बोअरवेल) पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांची संपूर्ण मदार येलदरी व इसापूर धरणांच्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असणार आहे.
गिरगावसह परजना, खाजमापूर वाडी, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द आदी गावांच्या शिवाराला इसापूर आणि येलदरी धरणाच्या कालव्यांचा लाभ मिळतो. मात्र, यंदा या दोन्ही धरणांमध्ये समाधानकारक जलसंचय न झाल्यामुळे रब्बीसाठी केवळ दोनच पाणी पाळ्या मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जलसंपदा विभागाकडून या पाणी पाळ्यांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे. भूजल पातळी खालावल्याने बागायती पिकांना मर्यादा आल्या असून, शेतकरी यंदा कमी पाण्यावर तग धरणाऱ्या हरभरा, गहू आणि ज्वारी या पिकांच्या पेरणीला पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या शिवारात रब्बीच्या पेरणीपूर्व पूर्वतयारीची लगबग पाहायला मिळत आहे. काही अल्पभूधारक शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी व वखरणीची कामे उरकत आहेत, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. कालव्याचे पहिले आवर्तन सुटताच हरभरा आणि गव्हाची पेरणी उरकण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे.
--
प्रतिक्रिया
रब्बी हंगामासाठी सध्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत सुरू आहे. विहिरींना पुरेसे पाणी नसल्याने येलदरी धरणाच्या कालव्याची पहिली पाणी पाळी सुटण्याची वाट पाहत आहोत. कालव्याचे पाणी येताच जमीन भिजवून दोन एकरांवर हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे."
- अमोल कऱ्हाळे,
शेतकरी, गिरगाव