‘गोदावरी’ उभारणार सीआरएम प्रकल्प
---
‘ऑरिक’ बिडकीनमध्ये ३१.४५ एकरांवर मोठा विस्तार
---
योगेश पायघन : सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : देशातील आघाडीची स्टील आणि ऊर्जा उत्पादक कंपनी ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ने (जीपीआयएल) राज्यात आपल्या मोठ्या व्यावसायिक विस्ताराची घोषणा केली आहे. कंपनीला ‘ऑरिक’ बिडकीन औद्योगिक वसाहतीत ‘कोल्ड रोल्ड मिल’ (सीआरएम) प्रकल्पासाठी ३१.४५ एकर भूखंडाचे वाटपपत्र मिळाले आहे. यासोबतच, कंपनीच्या संचालक मंडळाने महाराष्ट्रात ‘बॅटरी एनर्जी स्टोअरेज’ आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासाठी ‘गोदावरी एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या पूर्ण मालकीच्या उपकंपनीची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड’कडून (एमआयटीएल) २२ सप्टेंबरला भूखंड वाटपाचे पत्र जारी करण्यात आले होते, जे कंपनीला २४ सप्टेंबरला प्राप्त झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर क्रमांक २५ मधील ‘प्लॉट क्र. ४-३’ कंपनीला प्रस्तावित करण्यात आला आहे. १ लाख २७ हजार २८५.९८ चौरस मीटर (सुमारे ३१.४५ एकर) क्षेत्रफळाचा हा भूखंड असून, या ठिकाणी अत्याधुनिक ‘कोल्ड रोल्ड मिल’ (सीआरएम) प्रकल्प उभारला जाणार आहे.
----
राज्यात नवी उपकंपनी
औद्योगिक भूखंडापाठोपाठ कंपनीने १ ऑक्टोबरला घेतलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात एका नव्या उपकंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव मंजूर केला. ‘गोदावरी एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ (जीईएसपीएल) असे या प्रस्तावित उपकंपनीचे नाव असून, ती ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ची १०० टक्के मालकीची उपकंपनी असणार आहे.
---
बॅटरी स्टोअरेज, हरित ऊर्जेवर भर
या उपकंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रात असणार आहे. ही कंपनी ‘बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम’ (बीईएसएस), अपारंपरिक ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी), वीज आणि संलग्न पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी), टर्नकी, टेस्टिंग, कमिशनिंग तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणार आहे.
---
१० लाखांचे प्राथमिक भांडवल
या उपकंपनीसाठी प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे १ लाख इक्विटी शेअर रोख स्वरूपात घेऊन सुरवातीला १० लाख रुपयांचे प्राथमिक भागभांडवल गुंतवले जाणार आहे. कंपनी नोंदणीची प्रक्रिया सध्या केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) माध्यमातून सुरू आहे. सेबीच्या ‘नियमन ३०’ अंतर्गत कंपनीने मुंबई शेअर बाजार (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) ही अधिकृत माहिती दिली आहे.
---
मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना
छत्रपती संभाजीनगर हे वाहन उद्योग आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र आहे. ‘ऑरिक’ बिडकीनमध्ये उभारल्या जाणाऱ्या सीआरएम प्रकल्पामुळे स्थानिक उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा सुलभ होणार आहे. तसेच, हरित ऊर्जा आणि बॅटरी स्टोरेज क्षेत्रातील नव्या उपकंपनीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे.