esakal | औरंगाबाद: तपोभूमी गोगाबाबा टेकडी
sakal

बोलून बातमी शोधा

gogababa maharaj

औरंगाबाद: तपोभूमी गोगाबाबा टेकडी

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: शहरातील बहुतांश लोकांना सोनेरी महालामागची गोगाबाबा टेकडी माहिती आहे. शुद्ध हवा आणि निसर्गरम्य वातावरणाबरोबरच ही नाथ पंथातील महान तपस्वी संत गोगानाथ महाराज यांची तपोभूमी आहे. गोगाबाबा टेकडीवर, टेकडीच्या पायथ्याला आणि बेगमपुरा भागात अशी तीन ठिकाणी त्यांची मंदिरे आहेत. संत गोगानाथ महाराज यांनी जिवंत समाधी घेतलेली गोगामढीला राजस्थान सरकारने तिर्थक्षेत्र घोषित करून ते विकसित केले आहे, त्याच धर्तीवर गोगाबाबा टेकडीला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी भाविक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.

नाथ संप्रदायातील संत गोगानाथ बाबांचा जन्म राजस्थानमधील चुरू (ददरेवा) जिल्ह्यातील असल्याची आख्यायिका सांगितली जाते. आज जी गोगाबाबा टेकडी ओळखली जाते. या टेकडीवर गोगानाथ महाराज ध्यान साधना करीत असत. या टेकडीच्या रांगांमध्ये गवळी समाजाची शेती असलेला अहिरमाळ आहे. या टेकडीवर ध्यानधारणेला बसलेले गोगानाथ यांना इथे शेती करणाऱ्या गवळ्यांनी पाहिले. कोणी तपस्वी महाराज आहेत म्हणून त्यांची ते सेवा करत गेले. भक्तांच्या आग्रहाखातर महाराज डोंगर उतरून बेगमपुरा भागात आले. गोगाबाबा टेकडीवरील मंदिर, टेकडीच्या पायथ्याला असलेले मंदिर आणि बेगमपुरा येथील मंदिर अशा तिन्ही ठिकाणी त्यांच्या सेवेची परंपरा आजही सुरू आहे. गोगाबाबा टेकडीवर दररोज हजारो नागरिक येतात. त्यामुळे या क्षेत्रालाही तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी संत गोगानाथ महाराज मंदिराचे पुजारी सूरज फत्तेलष्कर, संजय फतेलष्कर, माजी नगरसेवक विनायक (गणू) पांडे आदींनी केली आहे.

हेही वाचा: लातूर: बांधकामाच्या नोटीसांबाबत पदाधिकारी आक्रमक

जन्मोत्सवानिमित्त आज मिरवणूक-

श्री संत गोगानाथ महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त बेगमपुरा मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंगळवारी (ता. ३१) रात्री १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी (ता. एक) बेगमपुरा येथील मंदिरातून श्री. संत गोगानाथ महाराज यांच्या निशाणकाठीची डंका (पारंपरिक वाद्य) च्या गजरात मिरवणूक निघेल. ही मिरवणूक श्री संत गोगानाथ महाराज टेकडीपर्यंत मंदिरापर्यंत जाईल. तिथे महाप्रसादानंतर होईल. नंतर तिथल्या मंदिरात पूजा झाल्यानंतर पुन्हा वाजतगाजत बेगमपुरा मंदिरात निशाणकाठी आणली जाईल. या उत्सवाचा व महाप्रसादाचा महाराजांच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन संयोजकाच्यावतीने परमेश्वर जैस्वाल यांनी कळविले आहे.

loading image
go to top