जलजीवन मिशनचा गाजावाजा; गोरेगावकर मात्र तहानलेलेच!

जलजीवन मिशनचा गाजावाजा; गोरेगावकर मात्र तहानलेलेच!
Published on: 
ABD26J83266 गोरेगाव ः पाणीप्रश्नी ग्रामपंचायत कार्यालयावर रिकाम्या घागरींसह मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करताना संतप्त महिला. योजनेचा गाजावाजा, तरीही जल मिळेना - गोरेगावात महिलांचा घागर मोर्चा; ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या हिंगोली, ता. १६ : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ योजनेचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ग्रामस्थांवर ऐन हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. सोमवारी (ता.१६) संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी व हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी कार्यालयाच्या आवारात तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून परिसर दणाणून सोडला. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. गोरेगावात या योजनेवर भरमसाठ निधी खर्च झाला असून कामे पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात नळांना पाणीच येत नसल्याने योजनेच्या निकृष्ट कामांवर व अंमलबजावणीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गावात कोट्यवधी रुपये खर्चून योजना राबवूनही नागरिकांच्या घरांपर्यंत पाण्याचा थेंबही पोचलेला नाही. या संतापजनक परिस्थितीच्या निषेधार्थ आणि गावचा पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी महिलांना सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. पाण्यासाठी महिलांना दैनंदिन कामे सोडून वणवण करावी लागत आहे. ‘योजनेच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले गेले असून, या कामांची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,’ अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. या आंदोलनात भास्करराव पाटील, संतोष कावरखे, विठ्ठल साळुंखे, कैलास देवकर, राजू देवकर यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चौकट २३ नोव्हेंबरला जनआंदोलनाचा इशारा गावातील पाणीटंचाई ही मानवनिर्मित असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने गोरेगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा; अन्यथा २३ नोव्हेंबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.