८.२८ लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला सादर

८.२८ लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला सादर
Published on: 
पान ३ लीड ---- शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण; दिवाळीपूर्वीच बळीराजाला मदतीची आस सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ३० : यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने आणि वरुणराजाने तीव्र वक्रदृष्टी केल्यामुळे बीड जिल्ह्यातील बळिराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. खरिपाच्या पेरणीपासूनच पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल यंत्रणेने युद्धपातळीवर संयुक्तपणे केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या धक्कादायक अहवालानुसार, जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील तब्बल ८ लाख २८ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या ७ लाख ८४ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये जिरायत पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, बागायत पिके व फळबागांनाही दुष्काळाचा तीव्र फटका बसला आहे. प्रशासनाने तयार केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार, बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान बीड, गेवराई आणि केज तालुक्यांत झाले आहे. एकट्या बीड तालुक्यात १ लाख २५ हजार ४९१ शेतकऱ्यांचे तब्बल १ लाख १३ हजार ४६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर गेवराई तालुक्यात १ लाख २१ हजार ९४९ शेतकऱ्यांच्या १ लाख १२ हजार ४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. केज तालुक्यात १ लाख ५ हजार ९७६ शेतकऱ्यांचे ९३ हजार १५३ हेक्टर क्षेत्र करपले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यात ९३ हजार ५४० शेतकऱ्यांचे १ लाख २ हजार ४०४ हेक्टर, माजलगावमध्ये ७५ हजार ३९३ शेतकऱ्यांचे ६५ हजार ५६४ हेक्टर, पाटोद्यात ४९ हजार ८५५ शेतकऱ्यांचे ५५ हजार ५२३ हेक्टर, शिरूर कासारमध्ये ५४ हजार ८२६ शेतकऱ्यांचे ४६ हजार ३७३ हेक्टर, धारूरमध्ये ३७ हजार १३६ शेतकऱ्यांचे ३९ हजार ५१७ हेक्टर, अंबाजोगाईत (आकडेवारी उपलब्ध नाही) आणि वडवणी तालुक्यात २९ हजार १७१ शेतकऱ्यांचे २९ हजार २४९ हेक्टर क्षेत्र दुष्काळाने बाधित झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या या भयंकर नैसर्गिक आपत्तीमुळे एकंदर ६ लाख ९३ हजार १६० हेक्टरवरील जिरायती पिके, ७२ हजार ४६८ हेक्टरवरील बागायती पिके आणि १८ हजार ८५० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. वार्षिक सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून, सध्या धरणांमध्ये केवळ साडेबारा टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे आगामी हिवाळा आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न ऐरणीवर आला आहे. ----- शासनाच्या सुधारित निर्णयाने मदतीची आशा पल्लवित राज्य सरकारने दिवाळीसाठी बाधित शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, सुरुवातीला या मदतीतून दुचाकी व चारचाकी वाहनधारक शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. परंतु, वाढता विरोध आणि शेतकऱ्यांची दुरवस्था लक्षात घेऊन शासनाने या अटींमध्ये सुधारणा करत त्या शिथिल केल्या. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, शासनाकडून घोषित झालेली ही मदत आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर बँक खात्यात जमा व्हावी, अशी आर्त हाक बीड जिल्ह्यातील हतबल शेतकरी देत आहेत. ----- कोट खरीप हंगामात पावसाची ओढ आणि दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. शासनाने पूर्वीच्या काही जाचक अटी शिथिल केल्यामुळे आता पात्र ठरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाईची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाकडून यासाठी सर्वतोपरी आणि जलदगतीने कार्यवाही सुरू आहे. - शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.