Gram Panchayat : बहुमताऐवजी नेत्यांचे सरपंचपदावरच लक्ष! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat

Gram Panchayat : बहुमताऐवजी नेत्यांचे सरपंचपदावरच लक्ष!

पैठण : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्वांचे लक्ष त्यावरच आहे. सदस्यपदाच्या निवडणुकीत शक्ती खर्च करण्याऐवजी सरपंचपदाची निवडणूक जिंकली की बाजी मारली, असे आडाखे बांधले जात आहेत. दरम्यान, नेते मंडळींचे लक्ष बहुमताऐवजी सरपंचपदावरच जास्त राहणार आहे. त्या अनुषंगाने आता थेट सरपंचपदाच्या खुर्चीकडेच नेते मंडळी लक्ष ठेवून आहेत.

निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गरजेनुसार १८ डिसेंबर रोजी मतदान व २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. बहुतांश गावांत पॅनेल टू पॅनेल लढतींची चिन्हे आहेत. पॅनलमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाचे एकापेक्षा अधिक उमेदवार असावेत यासाठी काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने त्यांचे जातीचे दाखले तयार ठेवणे, गरजेनुसार महिलांना निवडणुकीसाठी तयार करणे अशी तयारी सध्या सुरू आहे. दोन्ही गटांकडून सरपंचपद टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आता थेट सरपंचपदाच्या खुर्चीवर नेत्यांनी डोळा ठेवला असल्याची चर्चा गावा गावात होत आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पैठण तालुक्यातील अनेक गावांत सत्ता एकाची आणि सरपंच विरोधकांचा असे चित्र होते. ग्रामपंचायतीत बहुमत आणि सत्ता असतानाही सत्ताधाऱ्यांना सरपंचपदाने हुलकावणी दिली होती. बहुमत असतानाही सरपंच विरोधी गटाचा झाल्याने कामे करता आली नव्हती. त्यामुळे यावेळी अनुभवातून शहाणे झालेली नेते मंडळी ही ग्रामपंचायत निवडणुकीत आवर्जून उतरणार आहे.

फिप्टी फिप्टीचे गणित बिघडले!

दरम्यान, जनतेतून थेट सरपंच निवडीने अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरले असून, यापूर्वी चालणाऱ्या ''फिफ्टी- फिफ्टी'' हर्म्युल्याचे गणित यामुळे आता बिघडणार आहे. थेट सरपंच निवडणुकीतून आता योग्य उमेदवाराला गावाचा विकास करण्यासाठी पूर्ण पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. पूर्वी गावात राजकारण करणाऱ्या कोणत्याही एका पॅनलला बहुमत मिळाले नाही, तर त्या पॅनलला उमेदवार कमी पडत असेल बहुमत सिद्ध करणे कठीण होत होते. त्यामुळे पॅनलप्रमुख आपला सरपंच व्हावा, यासाठी ''फिफ्टी-फिफ्टी''चा फॉर्म्युला वापरत होते. या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवाराला अडीच-अडीच वर्षांसाठी सरपंचपद मिळायचे; परंतु आता हा फार्म्युला संपुष्टात आला आहे.