आता ग्रामपंचायत शिपायांवर शाळांच्या स्वच्छतेचीही जबाबदारी!
आठवड्यातून तीन दिवस करावी लागणार साफसफाई; जिल्हा परिषद प्रशासनाचे आदेश
----------
नांदेड, ता. ३० : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या शिपायांना आठवड्यातून तीन दिवस गावातील स्थानिक शाळांमध्ये जाऊन साफसफाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी आदेश जारी केले आहेत.
ग्रामपंचायत शिपायांकडून ग्रामपंचायत कार्यालय आणि परिसराची नियमित स्वच्छता केली जाते. मात्र, गावातील शाळांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शाळांमधील स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत शिपायांना नियमित कामांसोबतच आठवड्यातील तीन दिवस शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे निर्देश
जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) आपापल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींना यासंदर्भात आदेश निर्गमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ आणि मुंबई ग्रामपंचायत नोकरांबाबत (सेवेच्या शर्ती) नियम १९६० मधील तरतुदींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. सरपंचांनी नेमून दिलेली कामे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पार पाडणे बंधनकारक असल्याच्या तरतुदीचाही यासाठी आधार घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.