दिवाळीचे फटाके फुटताच आता जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीचे लागले वेध:अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

दिवाळीचे फटाके फुटताच आता जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीचे लागले वेध:अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
Published on: 
(अँकर) ग्रामीण भागात लागले निवडणुकीचे वेध गावोगावी राजकीय चर्चांना वेग; इच्छुकांची मोर्चेबांधणी, उमेदवारीसाठी नेत्यांकडे फिल्डिंग अंबड, ता. ९ (बातमीदार) : दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करत नागरिकांनी आनंद आणि उत्साहात सण साजरा केला. आता सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी आतापासूनच निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता केवळ निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. दिवाळीची आतषबाजी झाली आता निवडणुका कधी होणार, याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांना लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यांवर सध्या निवडणुकीच्या चर्चांना जोर आला आहे. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गटागटाने पारावर, चावडीवर, हॉटेलमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर गप्पा मारत आहेत. अनेकजण आपणच निवडणूक लढविणार असल्याचे सांगत तयारीला लागले आहेत. त्यासाठी काहींनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. ..... निवडणुका जाहीर होण्याकडे लक्ष निवडणुकीचा आखाडा रंगविण्यासाठी सर्वप्रथम निवडणुका जाहीर होणे आवश्यक आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतरच इच्छुकांना प्रत्यक्ष प्रचाराची दिशा ठरविता येणार आहे. मात्र, दिवाळी होताच अनेकांनी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत इच्छुकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.