गायरानावर बहरणार हिरवा चारा; बीडमधील ग्रामपंचायतींना ''मनरेगा''तून संधी

गायरानावर बहरणार हिरवा चारा; बीडमधील ग्रामपंचायतींना ''मनरेगा''तून संधी
Published on: 
बीडमधील गायरानांवर आता बहरणार हिरवा चारा ‘मनरेगा’तून ग्रामपंचायतींसह शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १५ ः जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी मनरेगा अंतर्गत आता थेट गावातील पडिक गायरान जमिनींवर हिरवा चारा बहरणार आहे. विशेष म्हणजे, या चारा लागवडीसाठी लागणारा मजुरी आणि साहित्याचा १०० टक्के खर्च शासन उचलणार असून, ग्रामपंचायतींसह पशुपालक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ३५ हजार ते कमाल १ लाख १३ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात अनेकदा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून प्रशासनाने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अर्थात मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गायरान जमिनी पडून आहेत. या जमिनींचा सुयोग्य वापर करून त्यावर चारा पिकांची लागवड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतल्यास संपूर्ण गावाचा चारा प्रश्न तर सुटेलच, शिवाय या कामाच्या माध्यमातून गावातील स्थानिक मजुरांना त्यांच्याच गावात रोजगारही उपलब्ध होईल. या योजनेत ग्रामपंचायतींसोबतच वैयक्तिक शेतकऱ्यांनाही आपल्या शेतजमिनीत चारा लागवड करता येणार आहे. भविष्यातील टंचाईचा धोका ओळखून आतापासूनच या योजनेची अंमलबजावणी केल्यास पशुधन जगवण्यास मोठी मदत होणार आहे. ---- खर्चाचा १०० टक्के भार शासनावर या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चारा लागवडीसाठी येणारा मजुरी आणि साहित्याचा संपूर्ण (१०० टक्के) खर्च शासन मनरेगाच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायती किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांवर लागवडीचा कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. ही योजना गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ----- कमी पाण्यातील मल्टीकट पिकांना प्राधान्य पाण्याची बचत व्हावी यासाठी कमी पाण्यात व अल्पावधीत येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. विशेषतः एकदा पेरणी करून अनेक वेळा कापणी करता येणाऱ्या (मल्टीकट) वाणांवर भर दिला जाणार आहे, जेणेकरून जनावरांना वर्षभर मुबलक हिरवा चारा उपलब्ध राहील. ----- पीकनिहाय मिळणारे अनुदान (प्रति हेक्टर) लसूण घास: १,१३,२९० रुपये बाजरी (मल्टीकट): ७६,०४४.५० रुपये नेपियर गवत: ७६,०३१ रुपये ज्वारी (मल्टीकट): ५१,०३६ रुपये मका: ४७,३०७ रुपये ज्वारी: ४२,७७८ रुपये बाजरी: ३५,५०५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.